उस्मानाबादच्या ५० गावांतील शिवसैनिकांचे उद्धव ठाकरेंना पत्र

जिल्ह्य़ातील शिवसेना कमकुवत करण्यास पालकमंत्री दीपक सावंत कारणीभूत ठरत आहेत. तसेच केवळ ध्वजारोहणास हजेरी लावणारे महादेव जानकर यांच्यामुळे शिवसेना कमजोर आणि राष्ट्रवादी शिरजोर असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या दोघांनाही हटवून शिवसेनेचा स्वतंत्र पालकमंत्री द्यावा, अशी मागणी उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातील ५० गावांच्या शिवसनिकांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पालकमंत्री दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या सामान्य शिवसनिकांनी जिल्हाप्रमुखांसह अन्य पदाधिकाऱ्यांना डावलत पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडेच गाऱ्हाणे मांडले आहे. उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातल्या ५० गावांच्या शिवसनिकांनी आपले निवेदन फॅक्सद्वारे मातोश्रीवर धाडले आहे. पालकमंत्री सावंत नको आणि जानकरही नको, असे या निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

शिवसनिकांची मूळ तक्रार पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या विरोधात आहे. पालकमंत्री जिल्हाप्रमुख आणि एक दोन तोंडावरील पदाधिकारी वगळता सामान्य शिवसनिकांशी साधा संवाददेखील ठेवत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि सनिकांचे प्रश्न त्यांना कसे कळणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. सहा महिन्यांतून एकदा पालकमंत्री येतात. तास-दोन तासांत सगळ्या बठका आटोपून धावपळीत निघून जातात. त्यांच्या या वागण्याची तक्रार केल्यास आपल्या पदावर कुऱ्हाड पडेल म्हणून अनेक आजी-माजी पदाधिकारी सावंतांची तक्रार करण्यास धजावत नाहीत, असेही  निवेदनात म्हटले आहे.

संयम राखला, पण..

आम्ही सर्व जण बाळासाहेबांचे कट्टर शिवसनिक आहोत, म्हणून जिल्ह्य़ातील सत्य परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचविणे आमचे कर्तव्य आहे. न्याय मिळत नसेल तर आवाज उठवलाच पाहिजे, ही बाळासाहेबांचीच शिकवण आहे. दोन वष्रे सावंत यांच्या कामकाजात सुधारणा होईल या भाबडय़ा आशेवर आम्ही संयम बाळगला. आता हे शक्य होत नसल्यामुळेच पत्र पाठवीत आहोत.  यावर विजय चंद्रकांत कवडे, आश्रुबा रामभाऊ बिक्कड, गजानन चोंदे, बापू तांबारे, मधुकर सूर्यवंशी, गोरख साळुंके, शौकत तांबोळी, अनंत मिटकरी, गोकुळ किसन िशदे यांच्यासह उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातील ५० गावांच्या शिवसनिकांची स्वाक्षरी आहे.