औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात सोमवारी ९८.४८ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात ६५७ मतदार होते. त्यापैकी ६४७ जणांनी दिवसभरात मतदानाचा हक्क बजावला. विधानसभेच्या निवडणुकीत मतांची फाटाफुट होईल असे मानले जात होते. मात्र, शिवसेना-भाजपने आज युती अभेद्य असल्याचे मतदानापूर्वी संकेत दिले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मतदानाच्या वेळी हजर होते. यात, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. मतदानानंतर निवडून येण्याचा दावा शिवसेनेने केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती.

वैध मतांच्या ५० टक्के व त्यात आणखी एक मत वाढवून उमेदवाराच्या यशाचा कोटा ठरविला जातो. ३२५ मतदान घेणाऱ्या उमेदवारास विजय मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेने आपले नगरसेवक फुटू नयेत याची विशेष काळजी घेतली होती.

औरंगाबाद शहरातील एमआयएमच्या नगरसेवकांना त्यांच्या मताप्रमाणे कोणालाही मतदान करण्याचे अधिकार देण्यात आले होते. तर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी युतीच्या बाजूने मतदान केल्याचा दावा केला जात आहे. मतदानादरम्यान एमआयएमच्या कोठडीतील नगरसेवकाला मतदानाची परवानगी देण्यात आली होती. पोलीस बंदोबस्तात त्याला मतदान केंद्रापर्यंत आणण्यात आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्यासह प्रमुख नेते शिवसेना नगरसेवकांच्या संपर्कात होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात अलीकडे भाजप-सेनेचा वरचष्मा आहे. मात्र, फाटाफुट झाल्यास यश मिळू शकते, असे ठरवून काँग्रेसने बाबुराव कुलकर्णी यांना उमेदवारी दिली होती. जालना जिल्ह्य़ातील २७२ मतदारांपैकी २६५ जणांनी मतदान केले. मतदानाची ही टक्केवारी ९७.४३ एवढी आहे.