ग्रामीण भागातील शाळांची दूरावस्था

ग्रामीण भागातील शाळांची अवस्था पडझडीच्या स्थितीत असून विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच धडे-पाठ गिरवावे लागत आहेत. अनेक शाळा या १९०७ ते १९४९ या कालावधीतील म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर शाळा दुरुस्ती आवश्यक असल्याचा सूर उमटू लागला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सुमारे ११६ शाळांबाबत दुरुस्तीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.

चार दिवसांपूर्वी औरंगाबादजवळील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळून तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली होती. या पाश्र्वभूमीवर ग्रामीण भागातील जुन्या शाळांच्या इमारतींच्या अवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. जिल्ह्य़ातील ११६ शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव दाखल झाल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. या शाळांमधील २२० खोल्यांची दुरुस्ती करावी लागणार असल्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव आता शिक्षण समितीत ठेवण्यात येणार असून त्यानंतर बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक तयार करून घेतले जाईल. शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने २०१७-१८ या वर्षांसाठी १ कोटी ४० लाख रुपये मंजूर केले असले तरी अद्याप ही रक्कम प्राप्त झालेली नसल्यामुळे प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम पावसाळ्यानंतरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

दुरुस्तीच्या स्थितीतील सर्वाधिक २३ शाळा या औरंगाबाद तालुक्यातील आहेत. खुलताबाद तालुक्यातील २१ शाळा तर फुलंब्री व वैजापूर तालुक्यातील प्रत्येकी १४ शाळा आहेत. उर्वरित इतर काही तालुक्यांतील आहेत.

वैजापूर तालुक्यात येत असलेली लासूरगावची शाळा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या दप्तरी सर्वात जुनी ११० वर्षांची असून शाळा १९०७ सालची नोंद आहे. तर घोदलगावची शाळा १९३५ सालची आहे. फुलंब्री तालुक्यात येत असलेली कान्हेरी व उमरावती या शाळा १९४९ सालच्या आहेत. पैठण तालुक्यातील हषी येथील शाळा १९४८ सालची आहे.

यातील काही शाळा स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. इंग्रजांची राजवट संपुष्टात आल्यानंतर त्यांनी बांधलेल्या इमारतींचा वापर पुढे शाळांसाठी करण्यात येऊ लागला. अशा शाळांच्या इमारतींचे बांधकाम शंभर वर्षांपेक्षाही जुने असून आता त्यातील काही ठिकाणच्या भागाची डागडुजीची गरज निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अशा परिस्थितीत नायगावसारखी दुर्घटना धोक्याचा इशारा देत आहे.