निर्मितीचे केंद्र वाढविण्याचा विभागीय प्रशासनाचा निर्णय

औरंगाबाद:  दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना लागणारा प्राणवायूचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी गळती रोखण्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यत प्राणवायू निर्मितीचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. ३० खाटांच्यावर क्षमता असणाऱ्या सर्व रुग्णालयांनी प्राणवायू केंद्र सुरू करावीत असे प्रयत्न विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या पुढाकाराने हाती घेतले जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून तसे प्रस्तावही मागविण्यात आले आहेत. दरम्यान प्राणवायू पुरवठय़ात अनेक ठिकाणी अडथळे येत असून औरंगाबाद शहरातील मेडिकव्हर आणि अन्य एका रुग्णालयात प्राणवायूची स्थिती नाजूक झाली होती. मात्र, नंतर पुरवठा झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. प्राणवायू पुरवठय़ासाठी आवश्यक ती सारी व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठवाडय़ात उपचार घेत असणारे रुग्णांची संख्या आणि लागणारा प्राणवायू जेमतेम असल्याने रुग्णालयातील गळतीचे लेखापरीक्षण केले जाणार आहे. प्रत्येक रुग्णालयात प्राणवायू पुरवठय़ावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती नेमण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान शहरातील रुग्णांपेक्षा ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी मराठवाडय़ात ७ हजार ४८६ रुग्ण वाढले होते.  आतापर्यंत ७ हजार ४२१ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यत सर्वाधिक २४ जणांचा मृत्यू झाला असून औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यत मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक मृत्युदर परभणी जिल्ह्यत असून तो २.५७ एवढा आहे. औरंगाबाद आणि नांदेड शहरातील रुग्णसंख्या काहीशी स्थिर असली तरी ग्रामीण भागातील संसर्ग वाढू लागला आहे. मराठवाडय़ात ऑक्सिजनसाठी त्रिसूत्रीही केली जाणार आहे. प्राणवायूचा वापर कसा आणि किती होतो या आधारे तीन वॉर्ड तयार केले जाणार असून कोणत्या रुग्णास अधिक प्राणवायू लागतो हे सांगण्यात येणार आहे.

खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट होत असेल तर त्यावर लेखापरीक्षक नेमण्यात येणार आहेत. येत्या काळात रुग्णसंख्या लक्षात घेता   प्राणवायूची मागणी आणि पुरवठा याचे गणित जुळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परळी, परभणी येथे विद्युत केंद्रातील  प्राणवायू निर्मिती केंद्र सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

मंगल कार्यालयांचे अधिग्रहण रद्द

औरंगाबाद शहरात करोना संसर्गाचा उद्रेक वाढल्याने बाधित रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेले कोविड सेंटरसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे करोना रुग्णांसाठी तातडीने ३१ मंगल कार्यालये अधिग्रहित करण्याचे आदेश काढण्यात आले होते. परंतु गृहविलगीकरणात उपचार घेण्याच्या सुविधा आणि रुग्णांचे प्रमाण घटत चालल्यामुळे मनपा प्रशासकांनी मंगल कार्यालये अधिग्रहित करण्याचा आदेश रद्द केला आहे.