दूषित पाण्यामुळे पिंडीची झीज होत असल्याचे कारण

बिपीन देशपांडे, औरंगाबाद</strong>

बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील वैद्यनाथाला अभिषेक करायचा असेल, तर त्यासाठी पिंडीवर बाटलीबंद पाणी आणण्याचाच आग्रह भक्तांकडे केला जात आहे. त्यासाठी परळीत होणाऱ्या दूषित पाणीपुरवठय़ाचे कारण काही पुजारी मंडळी पुढे करतात.

परळीत अजूनही जलस्रोतांमध्ये पाणी साठेल, असा पाऊस झालेला नाही. सध्या चांदापूर धरणातून पाणीपुरवठा होतो. संपूर्ण मंदिर परिसरासाठी ४० हजार लिटर पाणी लागते. त्यामध्ये स्वच्छता आदी कामे केली जातात. मात्र मागील काही महिन्यांपासून मंदिर परिसरातील नळाला येणारे पाणी दूषित आहे. त्यात अलिकडेच वैद्यनाथाच्या पिंडीवरील चांदीचे कवचही काढण्यात आले आहे. त्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यामागे भक्तांना थेट पिंडीचे दर्शन घेता यावे, ही मागणी असल्याचे सांगण्यात आले होते.

चांदीचे कवच काढल्यापासून थेट पिंडीवर अभिषेक करण्यात येत होता. मात्र, अभिषेकासाठी वापरण्यात येणारे पाणी हे दूषित असून त्यामुळे पिंडीची झीज होत असल्याचे मत काही पुजाऱ्यांनी मंदिर संस्थानकडे मांडले.

त्यामुळे मंदिर संस्थाननेच शुद्ध पाण्याचा वापर अभिषेकासाठी करावा, असा निर्णय घेतला. संस्थानकडून मंदिर परिसरात पाणी शुद्ध करणारे यंत्रही बसवण्यात आलेले आहे.

मात्र, त्याऐवजी भक्तांना थेट बाटलीबंद पाण्याचा आग्रहच केला जात आहे, अशा शब्दांत तक्रारीचा सूर ऐकायला मिळत आहे.

वैद्यनाथ मंदिर देवस्थान संस्थानने भक्तांच्या सोयीसाठी पाणी शुद्ध करण्याचे यंत्र (आरओ) बसवलेले आहे. त्याचेही पाणी अभिषेकासाठी वापरले जाते.

– विपीन पाटील, तहसीलदार तथा अध्यक्ष, मंदिर संस्थान.