यंदा दसऱ्याला तुळजापूरमधील व्यापाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. ऐन वेळी दर्शनरांगेत केलेले बदल, पावसाने ओढ दिल्याने भाविकांची संख्या लक्षणीय घटली. परिणामी नवरात्रोत्सवात व्यापाऱ्यांचे गणित पुरते बिघडून गेले. यात्रा कालावधीत कोटय़वधीचा माल तयार ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना तीन कोटींहून अधिक रुपयांचा फटका सहन करावा लागला.
वर्षभरातील आणि यात्रा कालावधीत १५ दिवसांत होणारी उलाढाल सारखीच असते. वर्षभरात जेवढा नफा पदरात पडतो, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त नवरात्र ते कोजागरी पौर्णिमा या कालावधीत होतो. मात्र, यंदा दरवर्षीप्रमाणे व्यापार होईल या अपेक्षेने कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला. जगदंबेच्या दर्शनासाठी यात्रा कालावधीत राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतून लाखोच्या संख्येने भाविक तुळजापुरात दाखल होतात. यात्रेदरम्यान तुळजापूर शहरात ६०-७० मालमोटारी भरून नारळ आणले जातात. सहा प्रमुख व्यापारी छोटय़ा-मोठय़ा व्यापाऱ्यांपर्यंत नारळ पोहोचवतात. अनेक ठोक विक्रेत्यांकडे नवरात्रोत्सवानंतर नारळांचे ढीग तसेच पडून आहेत. एक विक्रेते अभिजित टोले यांनी दीड-दोन लाख रुपयांचा फटका बसला असल्याचे सांगितले.
तुळजापुरात पेढय़ांचा ठोक व्यापार करणारे सहा-सात प्रमुख व्यापारी आहेत. सोलापूर, कुंथलगिरी व लातूर या ठिकाणांहूनही १५-२० व्यापारी पेढाविक्रीसाठी येतात. सर्वच व्यापारी सरासरी ३० ते ४० टन पेढा नवरात्रोत्सवात विकतात. पेढय़ाचे उत्पादक रघुनाथ निकम यांनी दरवर्षीच्या तुलनेत यंदा दीड ते दोन टन माल कमी विकला गेला असल्याचे सांगितले. रस्त्यावर टेबल टाकून पेढाविक्री करणाऱ्या ग्रामीण भागातील ६०-७० किरकोळ विक्रेत्यांचे हाल झाले. नफा लांबच, डोक्यावर कर्जाचा डोंगर घेऊन त्यांना गावी परतावे लागले.
पेढय़ाबरोबरच चुरमुरे, साखर, फुटाणे, बत्तासे आणि केम येथील हळदी-कुंकू याचाही तुळजापुरात मोठा व्यापार असतो. गुजरातहून २० हजार पोते चुरमुरे व्यापारी खरेदी करतात. हज्जुमियाँ पापामियाँ अत्तार यांनी साडेतीन हजार पोते चुरमुरे खरेदी केले होते. यातील २ हजार पोतेच माल विक्री झाला. दीड हजार पोत्यांची थप्पी दुकानात तशीच पडून आहे. केमहून ६० टनच्या आसपास हळदी-कुंकवाची खरेदी केली जाते. ५० टक्के माल बसून असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात ज्यांचे कुंकू सर्वात जास्त पसंतीने खरेदी केले जाते, ते कुंकवाचे उत्पादक नागनाथअप्पा वझे यांनी यंदा केवळ ४० टक्के व्यापार झाल्याचे सांगितले. दरवर्षी अडीच-तीन कोटींच्या कुंकवाची उलाढाल होते. या वर्षी कसेबसे पौर्णिमेच्या दोन दिवसांनी तारल्यामुळे सर्वाची मिळून ६०-७० लाखांपर्यंत उलाढाल झाल्याचे त्यांनी सांगितले.
जगदंबेच्या दरबारात बांगडय़ा खरेदी करणाऱ्या सुवासिनी महिला भाविकांची संख्या मोठी आहे. तुळजापुरात या बांगडय़ांचा व्यापार करणारे प्रमुख पाच व्यापारी आहेत. फुटपाथपासून ठोक दुकानापर्यंत सगळ्यांनाच मोठय़ा नुकसानीची झळ बसली. नंदकुमार बारसकर यांनी नवरात्रीसाठी तीन हजार तोडे खरेदी केले. यातील दीड हजार तोडे दुकानात पडून आहेत. भाविकांच्या सोयीसुविधा आणि व्यापाऱ्यांना पूरक धोरण असा मध्यम मार्ग असायला हवा होता, अशी प्रतिक्रिया बांगडय़ांचे व्यापारी प्रसाद वऱ्हाडे यांनी व्यक्त केली.
प्रासादिक वाणाबरोबरच खेळण्यांच्या व्यापाऱ्यांचीही उलाढाल यात्रा कालावधीत थेट ५० टक्क्यांवर आली. यात्रा कालावधी नसताना मंगळवार वा शुक्रवारी ५० हजारांचा व्यवसाय करणाऱ्या वर्धमान वऱ्हाडे यांना नवरात्राच्या काळात ३० हजारांचा टप्पाही गाठता आला नाही.