करोना आजार नाथभक्तांसाठी वाईट बातमी घेऊन आला आहे. चीनमध्ये उद्रेक झालेल्या करोना विषाणुमुळे जगभरात भीतीच वातावरणं निर्माण झालं आहे. भारतातही या विषाणुनं शिरकाव केला असून, गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पैठण येथे होणारी नाथषष्ठी यात्रा रद्द करण्यात आली आहे. गेल्या ४५० वर्षात प्रथमच ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यात्रा भरतात. यात्रांचा हंगाम सुरू झाला असून, अनेक प्रसिद्ध देवस्थानाकडून त्याच आयोजन केलं जातं. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे नाथषष्ठी सोहळ्याचं दरवर्षी होतो. मराठवाड्यासह राज्यभरात हा सोहळा प्रसिद्ध आहे. त्यामुळे ठिकठिकाणांहून भाविक नाथांच्या चरणी माथा ठेवण्यासाठी येथे येतात.

यंदा १४ ते १६ मार्चच्या दरम्यान पैठण येथे नाथषष्ठी यात्रा आयोजित करण्यात आली होती. मात्र, मध्येच करोनानं डोक वर काढलं. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून खबरदारी घेतली जात असून, गर्दी होणाऱ्या कार्यक्रम टाळण्याचं आवाहन केलं जात आहे. नाथषष्ठीला होणारी गर्दी आणि करोनाचा धोका यापार्श्वभूमीवर नाथषष्ठी यात्रा स्थगित करण्याचे आदेश औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी करोनासंदर्भात जिल्हाधिकारी आणि आरोग्यविभागाची बैठक घेतली. याबैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील यात्राबद्दल निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रा स्थगित करण्याचे आदेश जारी केले.

अशी होते यात्रेची सुरूवात

या यात्रेची औपचारिक सुरुवात गावातील रांजणाच्या पूजनानंतर गोदावरी नदीतून आणलेले पाणी त्यात टाकण्याच्या पारंपरिक प्रथेने होते. या रांजणाला पौराणिक महत्त्व आहे. साक्षात पांडुरंग, श्रीकृष्ण आणि उद्धवाने श्रीखंडय़ाच्या रूपात बारा वर्षे नाथांच्या घरी कावडीने पाणी भरले, अशी कथा नाथ चरित्रात आहेत. नाथषष्ठी यात्रा महोत्सव सुरू होण्यापूर्वी विजयादशमीला हा रांजण चंदनाने धुतला जातो व पुन्हा बंद केला जातो. तुकाराम बीजेच्या दिवशी ज्या वेळेला पांडुरंगाची पंढरीत पूजा सुरू असते, त्याच वेळी पैठणला या रांजणाची फूल आणि अक्षताने पूजा करण्यात येते. पंढरीत पांडुरंगाच्या एका खांद्यावर कावट आणि एका खांद्यावर घोंगडे ठेवले जाते. या दिवसापासूनच पैठण येथे नाथभक्तही गोदेचे पाणी हे रांजणात आणून टाकतात.