राष्ट्रीय महामार्गावरील दारूची दुकाने बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला. मात्र, गावात असलेल्या देशी दारू दुकानामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. यापार्श्वभूमीवर सध्या औरंगाबाद जिल्ह्यात दारूबंदीच्या मागणीचा जोर वाढताना दिसतोय. दारुबंदीविरोधात जिल्ह्यातील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हातील अनेक गावात दारुबंदीच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याचे दिसले. हाच मुद्दा घेऊन शुक्रवारी पैठणकरांनी लोकशाहीच्या मार्गाने दारुबंदीच्या मागणीसाठी आंदोलन केले.  पैठणकरांच्या आंदोलनात गांधीगिरीची झलक पाहायला मिळाली. पैठणमधील दारूबंदी कृती समितीने कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता शांत मार्गाने आंदोलन केलं. देशी दारूच्या दुकानावर जाऊन त्यांनी दारू प्यायला आलेल्या लोकांना दूध वाटप करत दारुबंदीची मागणी केली.

दोन दिवासांपूर्वी वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथील महिलांनी दारूबंदी विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनात महिलांनी दारुच्या दुकानाची तोडफोड करत दारुच्या बाटल्या पेटवून दिल्या होत्या. याउलट पैठणकरांनी  गांधीगिरीचा मार्ग अवलंबून दारू पिणाऱ्यांना दूध वाटप केल. यावेळी आंदोलनकर्त्यांनी गावातील दारूची दुकान बंद करावी, अशी मागणी केली. यामध्ये पैठण तीर्थ क्षेत्राच्या परिसरात १० किलोमीटरपर्यंत दारू दुकान चालवू देऊ नये, अशी मागणी देखील करण्यात आली. दारू दुकानामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. तसेच अनेक संसार वाऱ्यावर पडत आहेत. त्यामुळे दारुबंदीच्या विरोधात औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महिला आणि पुरुष दारुबंदीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत आहेत.  दारुबंदी विरोधातील आंदोलनामुळे जिल्ह्यातील किती गावातून दारुची दुकाने हद्दपार  होणार हे येणारा काळच सांगू शकेल.