भाजपा सत्तेत आल्यानंतर वरिष्ठ नेत्यांचा शरद पवार यांच्यावरील रोष नरमल्याचे वातावरण होते. (स्व) गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाचा पायाच पवार विरोध होता. भगवानगडाच्या पायथ्याशी मंगळवारी मेळावा घेत त्यांच्या कन्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी पवार विरोधी गटाचे नेतृत्व स्वत:कडे घेत भाजपअंतर्गत राजकारणालाही इशारा दिल्याचे मानले जात आहे. भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या मेळाव्यात ‘बारामती’ची सुपारी घेऊन भगवानगडाचा वाद घातल्याचा आरोप जानकर यांनी  केला. सदाभाऊ खोत व राजू शेट्टी या दोघांसह राम शिंदे यांना मेळाव्यात भाषणाची संधी देऊन पंकजा मुंडे यांनी राजकारणातील ‘ओबीसी मोट’ शरद पवार विरोधी राहील, हा संदेश जोरकसपणे दिला आहे. त्यामुळे भाजपाच्या अंतर्गत राजकारणालाही पंकजा मुंडे यांनी मोठा संदेश दिल्याचे सांगितले जाते.

भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या विरोधानंतर मंगळवारी पायथ्याशी झालेल्या मेळाव्यात ‘माधव’ या सूत्राची बांधणी पुन्हा एकदा करण्यात आली. ‘माळी, धनगर, वंजारी’ ही ओबीसीची मोट ४० मतदारसंघात निर्णायक ठरू शकणारी असल्याने त्याचे नेतृत्व कोणाकडे असा प्रश्न गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर निर्माण झाला होता. मेळाव्यात ‘आम्ही पंकजा मुंडे यांच्या पाठिशी आहोत’, असे सदाभाऊ खोत, महादेव जानकर, राम शिंदे व राजू शेट्टी यांनी जोरकसपणे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून भाजप अंतर्गत राजकारणात पंकजा मुंडे यांना डावलले जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये होती. केंद्रीय नेतृत्वाने पवार विरोधी सूर नरमाईचा आळवला. सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांचे केलेले कौतुक आणि नितीन गडकरी व पवार यांच्यातील ‘मैत्र’ यामुळे भाजपच्या पवार विरोधावर प्रश्नचिन्ह उभे राहील, असे वातावरण सर्वसामान्यांमध्ये होते. त्यामुळेच पंकजा मुंडे यांच्या राजकारणाला काहीसे बाजूला करण्यात आल्याचे चित्र होते. मंगळवारच्या मेळाव्यातून पवार विरोधक म्हणून प्रतिमा असणाऱ्या सर्व नेत्यांना पंकजा मुंडे यांनी जवळ केल्याचे दिसून आले. त्यामुळेच अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामार्फत सुपारी घेऊन महंतांना विरोध करायला लावल्याचा आरोप महादेव जानकर यांनी केला. भाजप पंकजा मुंडेंना किती साथ देईल, हे सांगत नाही. पण आपण मात्र कायम साथ देऊ, असे जाहीरपणे सांगण्यात आले. बहुतांश वक्त्यांनी भाजपा अंतर्गत वादावरही सूचकपणे विधाने केल्यामुळे ओबीसी राजकारणाचे नेतृत्व स्वत:कडे घेतल्याचा संकेत स्पष्टपणे देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची पंकजा मुंडे यांनी घेतलेली भेटही याच राजकारणाचा एक भाग होता, असेही आवर्जून सांगितले जात आहे. पवार विरोधी राजकारणाचा ‘ओबीसी’ सूर पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भगवानगडाच्या मेळाव्याकडे या राजकीय अंगाने पाहिले जात आहे.