भगवानगड वादावर पंकजांची ट्विपणी

भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या वादावर मौन बाळगलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट करून अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील ‘आग लगाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा’ यासह सात ओळी प्रसारित करून आपल्या समर्थकांना संदेश दिला आहे. महंत शास्त्री दसरा मेळावा होऊ न देण्यावर ठाम असून दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांनी कोणतेही जाहीर वक्तव्य न करता मेळावा घेण्याचा निश्चय केल्याने राज्यभरात मुंडे समर्थकांनी बठका घेऊन ‘चलो भगवानगड’ची हाक दिली आहे. तर गडाच्या वादात भाजप व रासपचे महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेंना पाठिंबा देत गडाच्या वादापाठीमागे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे.

बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवरील श्रीक्षेत्र भगवानगडावरील दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडे यांच्या भाषणावरून मागील पंधरा दिवसांपासून महंत नामदेव शास्त्री आणि मुंडे समर्थकांत संघर्ष तीव्र झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी महंत शास्त्रींच्या विरोधातील पंकजा मुंडेंचे ध्वनी संभाषण प्रसारित झाल्यानंतर या वादाला नवे वळण मिळाले. दुसऱ्याच दिवशी मुंडे समर्थकांनीही महंत शास्त्री यांच्या कथित वक्तव्याचे एक ध्वनी संभाषण समाजमाध्यमातून प्रसारित केले. त्यावरून वाद सुरु आहे.