भगवानगडावरील दसरा मेळाव्याकडे सर्वाचे लक्ष

भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी दसरा मेळावा व पंकजा मुंडे यांच्या भाषण बंदीची भूमिका कायम ठेवली असली तरी पंकजा मुंडे यांनीही मेळावा घेण्याचा निर्धार केला आहे. दसऱ्याच्या दिवशी साडेअकरा वाजता हेलिकॉप्टरने गडावर जाण्याचा निश्चय केल्याचा त्यांच्या शासकीय दौऱ्यावरून स्पष्ट झाले आहे. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनीही गोपीनाथगड ते भगवानगड रथयात्रेची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे महंतांचा विरोध असला तरी मुंडे भगिनींनी गडावर जाऊन मेळाव्याची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न चालवला असल्याने गडावर काय संघर्ष होतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या  भगवानगडावर दसरा मेळाव्याला राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भक्तगण येतात. काही वर्षांपासून या ठिकाणी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणांमुळे गडाच्या मेळाव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले. दिवंगत मुंडे यांच्यानंतर दोन वर्ष ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात भाषण केले. मात्र अकरा महिन्यांपूर्वी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावर राजकीय नेत्यांच्या भाषणाला बंदीची घोषणा केली. तेव्हापासून शास्त्री आणि मुंडे समर्थकांत संघर्ष सुरू झाला. दसरा दोन दिवसावर आल्याने संघर्ष अधिक वाढला असून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महंत शास्त्री यांनी मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाला लेखी पत्र देऊन गडावर कोणताही मेळावा, राजकीय व्यक्तींना बोलण्यास परवानगी देऊ नये. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास शासन जबाबदार राहील असे कळवून मेळाव्याला व भाषणाला बंदी असल्याची भूमिका कायम ठेवली. दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांनी गडावर जाण्याचा निश्चय केला असून त्यांच्या शासकीय दौऱ्यानुसार ११ ऑक्टोबरला सकाळी साडेअकरा वाजता हेलिकॉप्टरने परळीहून भगवानगडाकडे जाणार आहेत. खासदार डॉ. प्रीतम मुंडे या परळीतील गोपीनाथगड ते भगवानगड अशी रथयात्रा काढणार असून या यात्रेची जोरदार तयारी सुरू केली आहे. खासदार मुंडे यांच्या समवेत शेकडो गाडय़ांचा ताफा यात्रेने गडावर धडकणार आहे. त्यामुळे भगवानगडावर मेळावा शांततेत होतो की संघर्ष होतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.