News Flash

कितीही घेरले तरी घाबरत नाही!

भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा

दसऱ्यानिमित्त भगवानगड परिसरात पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

पंकजा मुंडे यांचा इशारा; भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा

भगवानगडावरील ‘कट, कारस्थानांचा बुरुज’ उतरून मी पायथ्याशी आले असून पुढच्या वर्षी गडाच्या गादीवरील महंतच ‘लेक’ म्हणून मला बोलावतील. आजचे सीमोल्लंघन ‘शांतीचे आणि शक्तीचे’ असून समाजातील चंड-मुंड प्रवृत्ती संपवण्यासाठी आपला लढा आहे. राजकारणात अनेकदा युद्ध करावे लागते. मला कितीही घेरले आणि राजकारणात माझा अभिमन्यू केला तरी लोकांचे पाठबळ असल्याने मी कोणाला घाबरत नाही. असे सांगत लोक रस्त्यावर येऊन न्याय मागत असतील आणि तो देता येत नसेल तर सत्तेचा उपयोग काय, असा सवाल करत त्यांनी जनतेमुळे मी सत्तेत आहे हे विसरणार नाही आणि  विसरूही देणार नाही, असा इशारा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला.

श्रीक्षेत्र भगवानगडावर दसरा मेळाव्याला परवानगी नाकारल्यानंतर मंगळवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे दुपारी एकच्या सुमारास रथयात्रेतून गडाच्या प्रवेशद्वाराजवळ आगमन झाले. पोलिसांनी जमावबंदी लागू केली असली तरी मोठय़ा संख्येने मुंडेसमर्थक जमल्यामुळे रथातून मुंडे यांना खाली उतरणेही अशक्य झाल्याने व रथासहित गडामध्ये जाण्याची परवानगी देण्यावरून बराच वेळ संघर्ष झाला. अखेर पोलिसांनी नमते घेत रथासह पंकजा मुंडे यांना प्रवेश दिला. संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मुंडे परत रथातून गडाच्या पायथ्याशी असलेल्या सभास्थळी दाखल झाल्या. यावेळी मंत्री राम शिंदे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह भाजपचे आमदार, पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनीच भगवानगडावरील श्रद्धेचा आणि भक्तीचा वारसा चालवण्याचे मला सांगितले. भगवानगडानेही मला कन्या मानल्याने आमचे बाप-लेकीचे नाते झाल्याने मी कधीही गडाबद्दल अपशब्द बोलणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील हिरकणीच्या कथेचा दाखला देऊन मुंडे म्हणाल्या, आज मीही ‘गडावरील कट कारस्थानांचा बुरुज’ उतरून खाली आले आहे. गडापासून ५०० मीटरवर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहते आणि मध्ये कशी राहात नाही हे कळत नाही का, हे कोण करते आहे, असा प्रश्न करून समाजातील चंड-मुंड राक्षसीप्रवृत्तीचा वध करायचा आहे. समाजातील हुंडा आणि स्त्रीभ्रूण हत्या संपवण्याची त्यांनी शपथ घेतली. राजकारणात अनेकदा युद्ध करावे लागते. मला कितीही घेरले, राजकारणात अभिमन्यू केला तरी मी कोणाला घाबरत नाही. माझ्यात अहंकार नसून स्वाभिमान आहे.

सत्तेपेक्षा परिवर्तन महत्त्वाचे

यापेक्षाही समाजात पूर्वी शेतकरी, कष्टकऱ्यांचे मोच्रे निघत होते. आता जातीचे मोच्रे निघत आहेत. त्यांना न्याय देता येत नसेल तर सत्तेचा उपयोग काय? पण त्यांच्यावर मोच्रे काढण्याची वेळ का आली? मराठा, ओबीसी, दलित सर्वाना न्याय मिळाला पाहिजे. पण इतके दिवस का दिला नाही, एकाच वर्षांत का अपेक्षा करता, मराठा समाजाचे नेते अनेक वष्रे सत्तेत असतानाही त्यांच्या समाजाला न्याय देऊ शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

आजच्या दसरा मेळाव्यातील शांतीचे आणि शक्तीचे सीमोल्लंघन झाल्यामुळे भविष्यात सुवर्णकाळ असेल. माझा राजीनामा हेलिकॉप्टरमध्ये तयार असतो. सत्तेपेक्षा मला ऊसतोड मजुरांच्या जीवनात परिवर्तन करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

महंतांची भेट टाळली

भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री व पंकजा मुंडे यांच्यातील वादामुळे दसरा मेळाव्याला संघर्षांचे स्वरूप प्राप्त झाले होते. गडावर जमावबंदीचा आदेश लागू करून प्रवेशद्वारातून भाविकांना रांगेने दर्शनासाठी सोडण्यात येत होते. सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना महंत शास्त्री यांनी पंकजाबरोबर कुठलाही वाद नाही, तिचे आपण स्वागत करू. माहेरचे दोन घास तिने खाऊन जावे, असे निमंत्रण दिले होते. मात्र, पंकजा मुंडे संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन परतल्या. शास्त्रींची भेट त्यांनी टाळली. प्रवेशद्वारावर पंकजा मुंडेंचे आगमन झाल्यानंतर पोलिसांनी तब्बल एक तास दर्शन बंद केले. गडाच्या इतिहासातील दर्शन बंद होण्याची ही पहिलीच वेळ.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 1:17 am

Web Title: pankaja munde comment on maratha reservation
Next Stories
1 पक्षांतर्गत राजकारणाला पंकजा मुंडे यांचा शह
2 सोयाबीन प्रश्नी सदाभाऊ खोत यांची भंबेरी
3 मराठवाडय़ात यापुढे पाइपलाइनमधूनच पाणी – मुख्यमंत्री
Just Now!
X