संत वामनभाऊ, भगवानबाबा या थोर संतांनी जात-पात, धर्म-पंथ असा भेदभाव न करता सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. अशा संतांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम राजकारण्यांनी करावे. गडावरून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम व्हावे. विठ्ठल महाराज ‘परवानगी’ देतील तोपर्यंत गडावर येणार, असे सांगून गोपीनाथ मुंडे यांच्या गादीवर मीही बसले, पण ती गादी काटेरी आहे. अनेक अडथळे पार करीत काम सुरू असल्याची भावना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथगड येथे संत वामनभाऊ यांचा ४० व्या पुण्यतिथी सोहळा सोमवारी झाला. या वेळी मंत्री पंकजा मुंडे, गृह राज्यमंत्री प्रा. राम िशदे, आमदार जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख व मोनिका राजळे, माजी आमदार साहेबराव दरेकर, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, सुशीला मोराळे आदी उपस्थित होते. श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी गडावरून राजकीय भाषणबाजीला बंदी केल्याच्या निर्णयावरून वादंग उठले आहे. या पाश्र्वभूमीवर गहिनीनाथगडावर मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार असल्याने मोठय़ा संख्येने भाविक भक्तांची गर्दी होती. मंत्री मुंडे म्हणाल्या की, बीड जिल्ह्यास संत भगवानबाबा, वामनभाऊ यांच्यासारख्या थोर संतांची परंपरा आहे. जात-पात, धर्म असा भेदभाव न करता सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम या संतांनी केले. संतांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम राजकारण्यांनी करायचे आहे. गडावरून वंचित आणि शोषित घटकांना न्याय देण्याबरोबरच समाजाला योग्य दिशा देण्याचे काम होणे आवश्यक आहे. गडाच्या विकासाला सर्वतोपरी मदत देऊ, अशी ग्वाही देऊन महंत विठ्ठल महाराज परवानगी देतील तोपर्यंत गडावर येणार असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या ठिकाणी काही नेत्यांनी मोठय़ा प्रमाणात केलेल्या बॅनरबाजीचा ओझरता उल्लेख करीत मंत्री मुंडे म्हणाल्या की, मला बॅनरबाजी करण्याची गरज नाही. जनतेच्या मनात माझे बॅनर आहे. माझे काम चांगले असेपर्यंत त्यांच्या मनात राहील, ते कोणीही काढून घेऊ शकणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. आमदार क्षीरसागर यांनी गहिनीनाथ गडावरील विकासकामांबाबत माहिती देऊन गहिनीनाथगडाने जाती-धर्मापलीकडे जाऊन माणसे जोडण्याचे काम केल्याचे सांगितले.
धनंजय मुंडेंच्या हस्ते महापूजा
परंपरेनुसार पहाटेस विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गडावर महापूजा केली. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना गड हे अध्यात्माचे ठिकाण आहे. राजकारणी माणसांकडून भाषणाच्या ओघात कुठलीही चूक होऊ नये, या साठी मी गेल्या १२ वर्षांपासून पूजा केल्यानंतर निघून जातो. मुख्य कार्यक्रमाला थांबत नाही. हा गड माझ्यासाठी शक्तिस्रोत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.