21 November 2019

News Flash

सरपंच अपात्रतेचा वाद; मंत्री मुंडे यांचा आदेश न्यायालयाकडून रद्द

अप्पर आयुक्तांनी सुनावणीअंती २५ सप्टेंबर २०१८ रोजी सरपंच, सदस्यपद रद्दचे आदेश दिले.

औरंगाबाद : उपसरपंचाची निवडणूक न घेतल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यतील शिरड शहापूर (ता. औंढा नागनाथ) येथील सरपंच नंदा ठोंबरे यांचे सरपंच व सदस्यपद विभागीय अप्पर आयुक्त व ग्रामविकामंत्री पंकजा मुंडे यांनी रद्द केल्याच्या प्रकरणात दाखल याचिकेत ठोंबरे यांना सरपंच, सदस्यपद पुन्हा बहाल करावे, तसेच उपसरपंचाची निवडणूक घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक निरीक्षकाची नेमणूक करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. व्ही. घुगे यांनी दिले.

नंदा ठोंबरे यांनी याचिका दाखल केली होती. प्रकरणात २०१७ मध्ये शिरड शहापूर ग्रामपंचायतीतून नंदा ठोंबरे थेट जनतेतून निवडून आल्या होत्या.

दरम्यान त्यांनी उपसरपंचपदाची निवडणूक न घेतल्याने त्यांच्या विरोधात कुतूबुद्दीन यांनी विभागीय अप्पर आयुक्त यांच्याकडे ग्रामपंचायत कलम ३९ नुसार सरपंच व सदस्यपद रद्द करावे अशी तक्रार दाखल केली. अप्पर आयुक्तांनी सुनावणीअंती २५ सप्टेंबर २०१८ रोजी सरपंच, सदस्यपद रद्दचे आदेश दिले.

निवडणूक निरीक्षक नेमण्याचे निर्देश

अप्पर आयुक्तांच्या आदेशाविरोधात याचिकाकर्त्यां ठोंबरे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे अपील दाखल केले. मात्र, मंत्री मुंडे यांनीही आयुक्तांचा आदेश कायम ठेवला. त्या विरोधात ठोंबरे यांनी अ‍ॅड. सुधीर चव्हाण यांच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली. सुनावणीदरम्यान याचिकार्त्यांतर्फे उपसचिव यांच्या ८ नोव्हेंबर २०१७ च्या आदेशानुसार उपसरपंचाची निवडणूक घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करून निवडणूक घ्यावी, असे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेशित केल्याचे अ‍ॅड. चव्हाण यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. याचिकाकर्त्यांनी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित नियुक्तीबाबत विनंती केली. मात्र, अद्याप निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. यावर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक निरीक्षकाची नेमणूक करण्याचे सूचित केले. तसेच ठोंबरे यांना सरपंच, सदस्यपद बहाल करण्याचे आदेश दिले.

First Published on June 29, 2019 4:45 am

Web Title: pankaja munde order canceled by court zws 70
Just Now!
X