नोटाबंदीच्या वर्षपूर्तीचा दिवस भारतीय जनता पार्टीकडून ‘काळा पैसा विरोधी दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्था अधिक बळकट झाली असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या विरोधावर बोलताना पक्ष वाढवण्यासाठी शिवसेना नोटाबंदीला विरोध करत असल्याचे दानवे यांनी सांगितले.

नोटाबंदीनंतर करदात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून ५६ लाख करदात्यांची भर पडली आहे. यात प्राप्ती कर भरणाऱ्यांची संख्या २४.७ टक्के तर वैयक्तिक करदात्यांची मुदतीपूर्वी कर भरण्याची संख्या ४१.७८ टक्क्यांनी वाढल्याचे त्यांनी सांगितले. काळा पैसा शोधण्यात सर्वाधिक यश मिळालं असून संशयास्पद असलेल्या १८ लाख बँक खात्याची चौकशी पूर्ण झाली आहे. रोखीने २ लाख ८९ हजार कोटींचा भरणा केल्याप्रकरणी तपास सुरु असून ४ लाख संशयित व्यवहारांचा शोध लावण्यात यश मिळाले आहे. नोटाबंदीनंतर १६ हजार कोटींचा काळा पैसा परत आला असल्याचंही दानवे यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, ३ लाखांहून अधिक संशयास्पद कंपन्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली. तर २ लाख १० हजार बनावट कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली. शेअर बाजारातील बोगस कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. बँकांनाही या नोटबंदीचा फायदा झाला असून बँकांतील ठेवी तीन लाख कोटींनी वाढल्याचं त्यांनी सांगितलं. ठेवी वाढल्यामुळे व्याजदर कमी होण्यास मदत झाली. तसेच देशातील डिजिटल व्यवहारात वाढ झाल्याचे ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांचा मतदार संघ असलेल्या जालन्यातील खासगी कंपनीवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला होता. यामध्ये कोट्यवधींचा काळा पैसा जप्त करण्यात आला. मात्र, यासंदर्भातील प्रश्नावर त्यांनी मौन बाळगले.