राज्यातील करोनाची रुग्णसंख्या वाढत असून, मुखपट्टी वापरण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. अशीच स्थिती राहिली तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिला. दरम्यान, राज्यात सोमवारी ३,३६५ नवे रुग्ण आढळले तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला.
एका शासकीय बैठकीनंतर अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. करोना रुग्णवाढ होत असलेल्या जिल्ह्यंमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा वेगाने शोध घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
अमरावती, वर्धा तसेच मुंबईमध्येही करोना रुग्ण वाढत आहेत. मुंबईतील उपनगरी रेल्वे सर्वासाठी खुली केल्यानंतर तिथे रुग्णवाढ नोंदविण्यात आली आहे. मुंबईतील करोनास्थितीवर लक्ष असल्याचे टोपे यांनी सांगितले.
येत्या काळात राजकीय सभांमध्ये होणाऱ्या गर्दीवरही निर्बंध ठेवण्यासाठी आचारसंहितेची गरज असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेऊ असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
रुग्णवाढीचा चढता आलेख
मुंबई : राज्यात सोमवारी ३,३६५ करोनाबाधित आढळले. साधारणपणे सोमवारी रुग्णसंख्या कमी आढळते. मात्र, जवळपास अडीच महिन्यानंतर सोमवारी (१५ फेब्रुवारी) रुग्णसंख्या साडेतीन हजारांच्या घरात पोहोचली. रविवारी सुट्टी असल्याने चाचण्या कमी होतात. त्यामुळे सोमवारी रुग्णांची संख्या इतर दिवसांपेक्षा कमी आढळते. गेल्या काही महिन्यांपासून असाच कल आढळतो. राज्यात ३० नोव्हेंबरला (सोमवार) ३८०० नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्णसंख्येत सातत्याने घसरण होत जानेवारीच्या शेवटच्या सोमवारी ती १८४२ नोंदविण्यात आली. परंतु, फेब्रुवारीमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याचे आढळते. गेल्या सोमवारी रुग्णांची संख्या २२१६ नोंदविण्यात आली असून, या सोमवारी तर रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा पार केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 16, 2021 12:42 am