औरंगाबाद : खासगी रुग्णालयाच्या दारासमोर तपासणीसाठी आलेला रुग्ण अचानक कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी, असा पेच उस्मानाबाद जिल्ह्य़ातील तेर या गावात सोमवारी निर्माण झाला. पाच तासांहून अधिक काळ मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाही. अखेर एका घंटागाडीतून त्याचा मृतदेह नेण्यात आला आणि चाचणीनंतर त्या करोनाबाधितावर किनी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

उस्मानाबाद तालुक्यातील किनी या गावातील ६५ वर्षांचे गृहस्थ त्रास होत असल्यामुळे खासगी डॉक्टरांकडे तपासणीसाठी आले होते. या रुग्णाला पुढील उपचाराची गरज आहे असे सांगितले आणि उस्मानाबाद येथे जावे, असा सल्ला त्यांना दिला. रुग्णालयाच्या बाहेर आल्यावर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांना बोलावून मृतदेहाची प्रतिजन चाचणी करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गाडीची शोधाशोध करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयातील एक रुग्णवाहिका गर्भवती महिलांसाठी राखीव असल्याने ती मिळाली नाही. खासगी तीन व चारचाकीचे चालक अधिक पैसे देऊनही मृतदेह नेण्यास पुढे आले नाहीत. त्यानंतर पाच तासांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाने मात्र हा कालावधी केवळ तीन तासांचा होता आणि कोविड नियमांचे पालन करत प्रक्रिया करण्याच्या कालावधीत तो वेळ अधिक गेला का, याची शहनिशा करण्यासाठी नोटिस बजावल्या असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी म्हटले आहे.

दिवसभरात ४० जणांचा मृत्यू

मराठवाडय़ात सरासरी १२५ ते १३० मृत्यू होत आहेत. आतापर्यंत ९ हजार ५५७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. औरंगाबाद शहरात मंगळवारी घाटी रुग्णालयात ४० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्य़ांतील ग्रामीण भागातील संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. अंगावर दुखणे काढल्यामुळे शेवटच्या क्षणी रुग्ण डॉक्टरांकडे येत आहेत. परिणामी उपचारासाठी पुरेसा कालावधी मिळत नसल्यामुळे दिसून येत आहे.