टाळेबंदीनंतर मनपाकडून कारवाईचा विचार

औरंगाबाद: करोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळेच लसीकरणाला प्राधान्य देत ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी महालसीकरण मोहीम हाती घेतली असून ११५ वॉर्डात लसीकरण सेंटर सुरू करण्यात आली आहेत. ३० एप्रिलपर्यंत ४५ वर्षांवरील नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन करीत टाळेबंदीनंतर रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल अन्यथा ५०० रुपये दंड आकारला जाईल, अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा विचार सुरू असल्याचे मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरातील करोना परिस्थिती संदर्भात माहिती देताना सांगितले,की शहरातील करोना रुग्णांची संख्या कमी होत असलीतरी ग्रामीण भागातून आणि इतर जिल्हयातून उपचारासाठी दाखल होत असलेल्या रुग्णांसाठी त्यांचे नातेवाईक व्हेंटिलेटर, अतिदक्षता विभागातील खाटा आणि प्राणवायू सुविधा असणाऱ्या खाटा मिळविण्यासाठी धावपळ करीत असल्याचे दिसून येत आहे. शहरात मार्च महिन्यात हजार ते बाराशे रुग्ण आढळून येत होते. आता मात्र सहाशे ते सातशे रुग्ण दाखल होत आहेत. रुग्णसंख्या कमी होण्यामागे प्रमुख कारण हे लसीकरण आहे.  मागील वर्षी जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर दिला होता. या वेळी  लसीकरण हा पर्याय समोर आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत १ लाख ९० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणासाठी महामोहीम हाती घेण्यात आली असून ११५ वॉर्डात लसीकरण सुरू करण्यात आले.

५ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट

शहराची लोकसंख्या साधारणपणे १५ ते १६ लाख इतकी आहे. सध्या दहा टक्के लसीकरण झाले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात असून त्यास प्रतिसाद मिळत आहे. जूनपर्यंत ५ लाख लसीकरण करण्याचे उद्दिष्ट मनपाने ठरविले आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार असल्यामुळे त्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरात ४० ते ५० टक्के लसीकरण व्हावे, असे प्रशासक पांडेय यांनी सांगितले.