औरंगाबाद : करोना महामारीने अनेकांच्या हातचे काम हिरावले. टाळेबंदीच्या काळात पोटासाठी काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यात काही हात पूर्वी पतंग निर्मितीचे कौशल्य शिकलेलेही होते. या हातांमध्ये पुन्हा कामटय़ा आणि चौकोनी आकार दिलेले कागद सोपवून पतंग व्यावसायिकांनी अडचणीच्या काळात काम दिले. आता असे हात पतंग निर्मितीतील कामाची दोर घट्ट धरून आहेत, असे येथील व्यावसायिक सांगतात.

नववर्ष आणि संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजीचा हंगाम सर्वत्र सुरू होतो. औरंगाबादेत सुमारे ६० ते ७० कुटुंबं पतंग निर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यातील काही पूर्णवेळ पतंग निर्मिती करणारे आहेत तर काही इतरही नोकरी सांभाळून काम करणारे. बुड्ढी लेन भागात बहुतांश दुकानांमधून तयार होणाऱ्या पतंगांना सोलापूर, नांदेड, जालना, वैजापूर आदी शहरांमधून मागणी असते. मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी वर्षभर पतंग तयार करण्याचे काम चालते. पण कमाईचा विचार केला तर पतंग निर्मितीचा व्यवसाय हंगामी स्वरुपाचा आहे. नववर्षांची सुरुवात ते संक्रांतीच्या कालावधीतील महिना-पंधरा दिवसांच्या कालावधीत मुले पतंग उडवतात. तेवढय़ा कालावधीतच पतंगांना मागणी असते. उर्वरित कालावधीत पतंगांची मागणी जेमतेमच असते. त्यामुळे अनेकांचा उदरनिर्वाह केवळ पतंग निर्मितीवरच चालत नाही. परिणामी एखाद्या कुटुंबातील पुरुष मंडळी कंपनीत, दुकानात नोकरी स्वीकारतो. अशांपैकी काहींची नोकरी टाळेबंदीत गेली. त्यांच्या रिकाम्या हातांना पुन्हा पूर्वीच्या पतंग निर्मितीच्या कौशल्यामुळे काम दिले. रिकामपणामुळे कामाची मागणीही होऊ लागली होती. टाळेबंदीत त्यांची उपासमार होऊ नये, यासाठी काहींच्या हातामध्ये पतंग निर्मितीतील प्राथमिक काम सोपवले. टाळेबंदीच्या कालावधीत आपल्याकडील माणसांनी २० ते २५ हजार पतंगांची निर्मिती केली, असे औरंगाबाद येथील व्यावसायिक कन्हैया राजपूत यांनी सांगितले.

मुलांच्या मोबाइलवेडाची चिंता

आजकालची मुले मैदानापेक्षा मोबाइल फोनवरच खेळताना दिसतात. त्यातून डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. मात्र, पतंग उडवण्यातून नजर तेज होते, हे मुलांना माहीत नाही. लक्ष्यही स्थिर होण्यास मदत होते. आकाशातील मांजा ओळखून त्याची काटाकाटी खेळण्यातून नजर सुधारते. मात्र, मुले मोबाइल फोनवरच अधिक गुंतून पडत असल्याची चिंता आम्हा व्यावसायिकांनाही वाटते. यातून मुलांसह आमचाही फायदा व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने आहे. घरांऐवजी मोकळ्या जागेत पतंग उडवला तर अपघाताचा धोका टळेल, असे कन्हैया राजपूत यांनी सांगितले.