13 August 2020

News Flash

विषाणूच्या अधिक जवळ जाणारी माणसे..!

करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वाची घरकोंडी झाली आहे. कधी कोण बाधित संपर्कात येईल आणि लागण होईल हे सांगता येत नाही.

संग्रहित छायाचित्र

 

सुहास सरदेशमुख

काळजी घेणे हीच जगण्याची पद्धत; औरंगाबादमध्ये तीन हजार ९३८ जणांची तपासणी

स्वसंरक्षणाचा पोशाख, नाकाला एन-९५ चे मास्क अशा स्थितीमध्ये सध्या सर्वात व्यस्त असणारी मंडळी विषाणू संशोधन आणि तपासणी प्रयोगशाळेतील हा अतिसंवेदनशील भाग. त्यामुळे काळजी घेणे, हीच येथील जगण्याची पद्धत.

विषाणू वाहतूक मीडियममधून आलेला लाळेचा नमुना काढून घेऊन त्याची करोना म्हणजे आरटी-पीसीआर ही चाचणी होण्याचा कालावधी सहा तासाचा. तेवढय़ा वेळात काही वेळा विषाणू असलेला किंवा नसलेला तो नमुना हाताळणाऱ्या प्रयोगशाळेतील व्यक्तींवर सध्या सर्वाधिक कामाचा ताण आहे. आतापर्यंत औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तीन हजार ९३८ नमुने तपासण्यात आले. एका वेळी ४६ नमुन्यांची साखळी पूर्ण केली जाते. हे काम अव्याहतपणे मोठय़ा नेटाने पुढे नेले जात आहे. घडय़ाळाचे काटे कोणी मोजतच नाही, असे करोना चाचणीच्या प्रयोगशाळेचे समन्वयक डॉ. अनिल गायकवाड सांगत होते.

करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वाची घरकोंडी झाली आहे. कधी कोण बाधित संपर्कात येईल आणि लागण होईल हे सांगता येत नाही. संशयित वाटला की, त्याच्या घशातील आणि नाकातील स्रावाचे नमुने घेतले जातात. हे नमुने ‘व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियममधून’ प्रयोगशाळेपर्यंत येतात. औरंगाबाद येथे हिंगोली, परभणी, नांदेड, जालना आणि औरंगाबाद याच पाच जिल्ह्यांतील नमुने येतात. मग हे नमुने प्रयोगशाळेत घेतल्यानंतर प्रत्येक नमुना उचलून तो यंत्रापर्यंत न्यावा लागतो. आरएनएपर्यंतची प्रक्रिया यंत्राविना केली जाते. त्यानंतर यंत्राच्या साहाय्याने चाचणीचे साधारणत: तीन टप्पे केले जातात. एका तपासणीमध्ये पहिल्या टप्प्यात अडीच तास, मग दीड तास आणि त्यानंतर तेवढाच वेळ. प्रत्येक टप्प्यावर प्रयोगशाळेत काम करणारे डॉक्टर निराळे असतात. प्रत्येक नमुन्यांचा कोड असतो आणि सहा तासाने ४६ नमुन्यांमध्ये विषाणू आहेत की नाही हे स्पष्ट होते. प्रयोगशाळेत सूक्ष्मस्वसंरक्षणाचे वेगवेगळे नियम आहेत. ते भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ठरवून दिलेले आहेत. योग्य काळजी घेणे हे या प्रयोगशाळेत काम करणाऱ्यांची जीवनपद्धतीच आहे. पूर्वी क्षयरोग तपासणीसाठीची ही प्रयोगशाळा आता करोनासाठी वापरली जात आहे. विषाणूच्या अधिक जवळ जात त्यात कोणाच्या शरीरात तो दडून बसला आहे, हे तपासून देणारी माणसे सध्या खूप काम करत आहेत. साधारणत: ४८ तासांत अहवाल देणे अभिप्रेत असते. पण अगदी २४ तासांतच तो देण्याचा प्रयत्न असल्याचा दावा डॉ. अनिल गायकवाड करतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, या विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती इरावणे, डॉ. अनिल गायकवाड, डॉ. मैत्रिक दवे, डॉ. धवल खत्री, डॉ. अमृता ओंकारी आदी जण या प्रयोगशाळेत काम करत आहेत.

अशी आहे जीवनपद्धती

डॉ. अनिल गायकवाड प्रयोगशाळेत आणि त्यांच्या पत्नी डॉ. अर्चना गायकवाड करोना वॉर्डात जिल्हा रुग्णालयात. घरी १२ वीमध्ये शिकणारी त्यांची मुलगी. चारचाकी वाहनातून उतरताना बहुतांश वस्तू, गॅजेट तेथेच ठेवायच्या. घराच्या दारात सगळे कपडे गरम पाण्यात भिजवायचे. पुढे आंघोळ करायची. अगदी चष्मासुद्धा साबणाच्या पाण्यातून काढायचा. सतत हात धुवायचे आणि चेहरा, डोळे यांना हात लावायचा नाही, ही सवय बनवायला हवी. तसेही संसर्ग होऊ नये अशी काळजी पूर्वी घेतच. मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार डॉ. अनिल गायकवाड यांनाही आहेत. पण ते म्हणतात, ही जबाबदारी आहे, आता ती पार पाडावीच लागेल. त्यामुळे आम्ही तिघे तीन खोल्यांमध्ये असे सध्या वातावरण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2020 1:13 am

Web Title: people who get closer to the virus abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 बेवारस वृद्धेच्या पार्थिवावर शिवसेना आमदारानं केले अंत्यसंस्कार; दिला मुखाग्नी
2 औरंगाबाद : जमावाचा पोलिसांवर हल्ला; अधिकाऱ्यासह तीन जण जखमी
3 वृत्तपत्र कागदाद्वारे करोनाचा फैलाव होत असल्याचा दावा तथ्यहीन
Just Now!
X