महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या निकालात मुलींनी यशाचे शिखर गाठून त्यांनी मुलांपेक्षा हुशार असल्याचे सिद्ध केले आहे. ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ निकषावर लावण्यात आलेल्या निकालात औरंगाबाद विभागीय मंडळाचा निकाल मागील पाच वषार्ंच्या तुलनेत घसरला असून विभागाचा निकाल ७५.२० टक्के लागला आहे. कोकण विभागाने निकालात ८८.३८ टक्के घेऊन बाजी मारली आहे. नऊ विभागीय मंडळात औरंगाबाद विभाग  सहाव्या स्थानी राहिला.

दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च या कालावधीत लेखी परीक्षा घेण्यात आल्या. शनिवारी ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागाच्या विद्यार्थ्यांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत निकाल घसरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकाल १३.६१ टक्क्यांनी कमी लागला आहे. गतवर्षी दहावीचा निकाल ८८.८१ टक्के इतका लागला होता.

तर औरंगाबाद विभागामध्ये एक लाख ८६ हजार ७९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापकी एक लाख ८३ हजार २२५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील १ लाख ३७ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ७५.२० टक्के एवढी आहे. औरंगाबाद विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यंचा समावेश आहे. जालना जिल्ह्य़ाचा निकाल ७६.१४ टक्के लागला आहे.

लातूरमध्येही टक्का घसरला

लातूर – नवा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धतीत बदल व तोंडी गुणात कपात केल्याने दहावीच्या परीक्षेच्या निकालात विभागात तब्बल १४ टक्क्यांची घसरण झाली आहे.  गतवर्षी लातूर विभागाचा निकाल ८६.३० टक्के एवढा होता. यावर्षी तो घसरून ७२.४७ टक्के एवढा खाली आला आहे. मुलीच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७८.२२ तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ६८.३५ इतके खाली आले आहे. विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर व प्रभारी सचिव चित्तप्रकाश देशमुख यांनी निकालाची माहिती दिली.

महाराष्ट्रात मराठी मातृभाषाच अडचणीत येत असल्याचे चित्र दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे. दहावीच्या परीक्षेत मराठी विषयाचा निकाल ७७.३७ टक्के इतका आहे, तर इंग्रजी विषयाचा ७६.६१ टक्के इतका आहे. इंग्रजी विषयात सर्वाधिक विद्यार्थी पूर्वी नापास होत असत. तो विषय विद्यार्थ्यांना जड जातो, अशी स्थिती होती. आता इंग्रजी विषयात उत्तीर्णतेचे प्रमाण वाढते आहे. मात्र, याचवेळी मराठी विषयात उत्तीर्णतेचे प्रमाण घटत आहे. गणित विषयात विद्यार्थ्यांची भीती कमी झाल्याचे दिसते आहे. यावर्षी गणिताचा निकाल ८७.३५ टक्के एवढा लागला. सोप्या समजणाऱ्या इतिहास, भूगोल विषयाचा निकालही ८६.६१ टक्के एवढा आहे.

हिंगोलीत ६४.५३ टक्के निकाल

हिंगोली- जिल्ह्य़ात १६ हजार ४०२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापकी १० हजार ५८४ विद्यार्थी उतीर्ण झाले असून  जिल्ह्यच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ६४.५३ टक्केआहे. यावर्षीसुद्धा मुलांपेक्षा मुलींच्या टक्केवारीचे प्रमाण १५.५६ टक्क्यांनी अधिक आहे. यावर्षी मराठी, गणित, इंग्रजी या विषयाचे अंतर्गत २० गुण न मिळाल्याने निकालाची टक्केवारी चांगलीच घसरल्याचे दिसते.  जिल्ह्यतील २१२ शाळांमधून १६ हजार ७३७  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापकी १६ हजार ४०२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. या परीक्षेत चार हजार ९९२ मुले तर पाच हजार ५९२ मुली असे एकूण १० हजार ५८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५७.२४ तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७२.८० इतकी आहे.

नांदेडचा ६८.१३ टक्के

नांदेड- नांदेड जिल्ह्यचा निकाल ६८.१३ टक्के एवढा लागला असून या निकालातही मुलींचीच सरशी झाली असल्याचे पाहावयास मिळाले. जिल्ह्यतील २५४ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली. ४६ हजार १९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापकी ४५ हजार १८० विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी ३० हजार ७८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात १५ हजार १८२ मुले, तर १५ हजार ६०० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत निकालात घट होऊन नांदेड जिल्हा विभागातून तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.

उस्मानाबादमध्ये टक्का घसरला

उस्मानाबाद- सलग चार वर्षांपासून  दहावीच्या निकालात सातत्याने घट सुरू आहे. गतवर्षी विद्यार्थ्यांनी त्याला छेद देत निकालाचा टक्का उंचावला होता. मात्र पुन्हा यंदा त्यात कमालीची घट झाली आहे. गतवर्षी ८५.६६ टक्के असलेला दहावीचा निकाल यंदा थेट ७२.१७ टक्क्यांवर आला आहे. तब्बल १३ टक्क्यांनी यशाच्या आलेखात घसरण झाली आहे. जिल्ह्यतील ४२२ शाळांमधून एकूण २२ हजार ७९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापकी २२ हजार ३४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १६ हजार १२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

बीडचा निकाल ८१.२३ टक्के

बीड- दहावीच्या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी निकालाचा टक्का घसरला असला तरी विभागातील जिल्ह्यचा दबदबा कायम राहिला आहे. औरंगाबाद विभागात बीडचा सर्वाधिक ८१.२३ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षी ९२.५४ टक्के गुण घेत जिल्हा विभागात पहिला आला होता. यावेळी तोच दबदबा कायम ठेवत जिल्ह्यने पुन्हा पहिला क्रमांक मिळवला आहे.

जिल्ह्यातून ४२  हजार ९६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापकी ३४ हजार ८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ८७.०९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर मुलांच्या उत्तीर्णतेचे  प्रमाण ७६.८८ टक्के आहे. शाळांच्या अखत्यारीत असलेले प्रात्यक्षिक परीक्षेचे २० गुण बंद केल्यामुळेच निकालावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

परभणी ६६.३५ टक्के

परभणी- दहावी परीक्षेत परभणी जिल्ह्य़ातील ६६.३५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी ८४.३९ टक्क्यांसह औरंगाबाद विभागात अव्वलस्थानी असलेला परभणी जिल्हा यावर्षी चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.

जिल्ह्यतील २८ हजार ९६४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापकी २८ हजार ११९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापकी १८ हजार ६५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा ७५.०५ तर मुलांचा ५९.५३ टक्के एवढे उत्तीर्णतेचे प्रमाण आहे.

असेही गैरप्रकार!

यावर्षी एका विद्यार्थ्यांने उत्तरपत्रिकेत चक्क ‘सैराट’ चित्रपटाची कथाच लिहिली आहे, तर एका विद्यार्थ्यांने मला नापास कराल तर तुम्हाला बघून घेईन, अशी थेट धमकीच देण्याचे प्रकारही आढळले आहेत. मात्र, परीक्षेतील गैरप्रकाराचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहेत. कारण परीक्षा पद्धत बदलल्यामुळे कॉपी करणे पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही.