औरंगाबाद पुरालेखागार विभागातील अनेक पुस्तकांचे भाषांतर रखडले

इतिहासाचा ठेवा संशोधनासाठी हवा असेल, तर त्या-त्या काळातील भाषा शिकाव्या लागतात. फारसी, मोडी, उर्दू या भाषा शिकल्याशिवाय इतिहासाचा नव्याने उलगडा होत नाही. मराठवाडय़ात पुरालेखागार विभागात या भाषेतील अनेक महत्त्वपूर्ण दस्तऐवज उपलब्ध आहेत. मात्र, त्याचा अनुवाद करणारी मंडळी नसल्याने माहितीचा मोठा स्रोत सध्या पडून आहे. भाषांतरासाठी रखडलेल्या या भाषेतील दस्तऐवजांसाठी या भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी पुढे यायला हवे, असे आवाहन केले जात आहे.

फारसी, मोडी, उर्दू भाषेतील महत्त्वाचे अभिलेख मुंबई, पुण्यातून मराठवाडय़ाच्या पुराभिलेख कार्यालयात पाठवण्यात आलेले आहेत. त्यातील फारशी भाषेतील तमसनामा, चिटणीसी फर्मान, वाकियाते दक्कन, अजदबे मिशन, हालाते जंग हाय, उमरातेमाब, मुहम्मदनामा, तारिखे नजराना, ट्रॅव्हल्स ऑफ निजामअलखान हे १७७० ते १७७१ या कालावधीतील प्रत्येक घटनेची नोंद ठेवलेले पुस्तक, जुदाशुदन, ऐबल फरंग, खिदमत, सलाबत जंग, कुतुहते आदिलशाह, तारिखी-ए-फरकुंदा, निजामांच्या प्रत्येक दिवसाच्या हिशेबाची माहिती नोंद केलेले पुस्तक, ब्रिटिश म्युझियम फ्रॉम लंडन, अशा तीन भागांतील माहितीचा ठेवा, आमले फराएस, झुबर इंजिल, असे अनेक दस्तऐवज, पुस्तकातील महत्त्वाची माहिती भाषांतराअभावी पडून आहे. काही पुस्तकांमध्ये मराठवाडय़ातील अगदी लहान-लहान घटनांची नोंद सापडते. कळमनुरीतील दिग्रस गावात गुप्तधन सापडल्याचा, महिलेचा विहिरीत पडून मृत्यू, दलितांची जमीन, मालकी, देवस्थानच्या मालमत्तांचा आराखडा नमूद असलेली अनेक कागदपत्रे येथे उपलब्ध आहेत. यातील काही कागदपत्रे उर्दू, फारसी भाषांमध्ये आहेत. त्यात नेमकी काय माहिती बंदिस्त आहे, याचा मराठीत भाषांतर होत नाही तोपर्यंत उलगडा होणार नाही. मुळात भाषांतरकारच नसल्याने फारसी भाषेतील माहिती दडली जात आहे.

महत्त्वाचे दस्तऐवजांची सुरक्षा वाऱ्यावर

पुरालेखागार कार्यालयात १८८६ ते १९४० या स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. त्यात औरंगाबाद आयुक्त, औरंगाबाद कलेक्टर, फारसी भाषेतील हस्तलिखिते, मोडी पद्धतीचे लिखाण आहे.

इतिहासाची मौलिक कागदपत्रे असताना त्यावर पहारा ठेवण्यासाठी रात्री येथे सुरक्षा रक्षकही नियुक्त नाही. येथे किमान तीन रक्षक गरजेचे आहेत. रेकॉर्ड कीपरची आवश्यकता आहे. सीसीटीव्ही देखील येथे नाहीत. त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे, असे प्रभारी सहायक संचालक शु. स. खान यांनी सांगितले.

लाख कागदपत्रांचे स्कॅिनग रखडले

कार्यालयातील महत्त्वाच्या कागदपत्रांचे स्कॅिनग मध्यंतरी सुरू होते. परंतु वर्षभरापासून ही प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे अंदाजे ४३३ गॅझेट्सची मिळून ७ लाख कागदपत्रांचे स्कॅिनगचे काम रखडले आहे. याशिवाय अनेक हस्तलिखित कागदपत्रांचा समावेश आहे. या वर्षी हे काम कुठल्याही एजन्सीला दिलेले नाही. सध्या कार्यालयात सहायक संचालक, फारसी जाणकार, डागडुजीकार (मेंडर), अशी अनेक पदे साधारण २०१० पासून रिक्त आहेत.