औरंगाबाद खंडपीठात याचिका
शनििशगणापूर येथील शनिदैवताचे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचा महिलांनाही अधिकार असल्याने त्याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली. या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारसह नगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच मंदिर विश्वस्त प्रशासनाने म्हणणे सादर करण्याची नोटीस न्यायालयाने बजावली आहे.
सर्व महिलांना पुरुषांप्रमाणेच दर्शनाचा अधिकार असल्याने त्यांच्या अधिकाराचे रक्षण करण्याबाबतचे निर्देश न्यायालयाने सरकारला द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका येथील डॉ. वसुधा पवार यांनी दाखल केली. न्या. आर. एम बोर्डे व एआयएस चिमा यांच्या खंडपीठाने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत.
प्रार्थनास्थळांमध्ये जाण्याच्या अधिकाराबाबत १९५६ च्या निर्णयाचा आधार याचिकाकर्त्यांच्या वतीने घेण्यात आला आहे. १९६६ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विश्वस्तांचे म्हणणे ऐकून पुढील निर्णय देण्यात येतील, असे न्यायालयाने नमूद केले आहे. पुढील सुनावणी १६ फेब्रुवारीला होणार आहे.