हौशी-शौकिनांमुळे उलाढालीत वाढ

पंजाबी मुक्का, कॉकटेल, ग्रेबाज, तारा, कल्लुमा-कलदुम्म, छाबदार, नसली हे शब्द भांडार कबुतरांच्या दुनियेतले. गुटर्रगुं करणारे कबुतर चित्रपटातले वेगळे. शांततेचे प्रतीक म्हणून उडवले जाणारे वेगळे. या कबुतराच्या जगाचा ‘अर्थ-विहार’ किती रुपयांचा असेल? उत्तर कोटय़वधींमध्ये आहे. कारण कबुतरांची एक जोडी चारशे रुपयांपासून ते पाच हजारांपर्यंत आहे. बाजारपेठ मालेगाव आणि शौकिन औरंगाबादेत. कबुतरबाजीवर प्रेम करणारी औरंगाबादची मंडळी दरवर्षी उडान स्पर्धाही घेतात. राज्यातूनच नव्हे तर परराज्यातील खास कबुतर या स्पर्धेसाठी आणले जातात. ज्या कबुतराचा विहार अधिक काळाचा तो विजेता. अशी स्पर्धा १३ एप्रिल रोजी औरंगाबादला होणार आहे.

प्रेमी युगुलांचे प्रणयाराधन चित्रपटात दाखवण्यासाठी पांढऱ्या रंगाची कबुतरांची जोडी, कबुतरावरचे गाजलेले गाणे, या पलिकडे कबुतरांच्या जगात नक्की काय आणि किती घडत असेल? औरंगाबादेत ‘मासूम परिंदा पिजन लव्हर्स फ्लाइंग क्लब’ नावाचा एक गट कबुतरबाजीवर प्रेम करा, असे सांगणारा आहे. ते आयोजित करत असणाऱ्या स्पर्धेचे बक्षीसही २१ हजारांपासून ते पाच हजारांपर्यंतचे आहे. वर्षांतून एकदा किंवा दोनदा घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत औरंगाबादसह बीड, जालना, धुळे, नगर, कोपरगाव, मालेगाव आदी पाच-सात जिल्ह्य़ांतील सुमारे शंभरच्या जवळपास स्पर्धक सहभागी होत आहेत. त्यासाठी अगदी निमंत्रण पत्रिकाही छापल्या जातात. हौशी स्पर्धक अगदी लग्नसोहळा वाटावा, अशा पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करतात. स्पर्धकांना अगदी जेवणही दिले जाते. तेही दोन-तीन दिवस.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कबुतरांसाठी विशिष्ट पद्धतीने तयारी केली जाते. म्हणजे कबुतरांची सुंदरता वाढवणे, आकाशातील विहाराचा कालावधी जास्त राहण्यासाठी पंखात विशिष्ट औषधांच्या माध्यमातून बळ दिले जाते. औषधाची गोळी पाण्यातून दिली जाते. कबुतर बाहेरच्या जिल्ह्य़ातले किंवा राज्यातले तर अगदी त्या राज्यातला माणूस दोन-चार दिवस मुक्कामी आणला जातो.

कबुतरांच्या मजेदार दुनियेबाबत येथील व्यापारी मेहमूद खान सांगतात, कबुतरांमधील पंजाबी मुक्का ही श्रेष्ठ प्रजात समजली जाते. त्याचे रुबाबदार दिसणे, विशिष्ट पद्धतीने खाणे-पिणे, उडणे, डोळ्यांची ठेवणही वेगळी असते. तुरा असलेले कबुतर आकर्षित करतो. कॉकटेल म्हणतात त्याला. ग्रेबाज, तारा, कल्लुमा-कलदुम्म, छाबदार, नसली कबुतर, उडानवाले, क्रीम, सफेद-फ्रेश, पल अशा कितीतरी प्रजाती त्यात आढळतात. मालेगावचे इरफान भाई सांगतात, की आपण या कामात वाडवडिलांपासून आहोत. दर बुधवारी व रविवारी औरंगाबादेत येऊन येथील व्यापाऱ्यांची मागणी काय आहे, याचा आढावा घेऊन जातो. जळगावचा तरुण व्यापारी सय्यद आमीर अली हा मेहमूद खान यांच्यासह स्थानिक व्यापाऱ्यांकडून माल घेऊन जातो.

कार्टुनपेक्षा कबुतरांमध्ये रमला

सातवीची परीक्षा दिलेला सोहम दयानंद भालेराव याला सध्या सुटय़ा लागल्या आहेत. कार्टूनपेक्षा कबुतरांच्या दुनियेत तो रमलेला दिसतो. अवघ्या अकरा-बारा वर्षांच्या सोहमला उड्डान स्पर्धा कशी असते, त्याचे नियम, बक्षिसांची रक्कम, कबुतरांच्या जाती, त्यांचे खाद्य, घरटय़ाचं दाभल हे नाव, पिलं किती दिवसात होतात, विक्रीसाठी कोणी आले तर त्याला किती किंमत सांगायची, असं सर्व काही माहिती आहे. हा छंद मोठा आनंददायी असल्याचे सोहम सांगतो. तर सकाळच्या वेळात सोहमला बोलायलाही वेळ नसतो, असे त्याचा मित्र श्रेयस शिंदे सांगतो.