हैदराबादहून औरंगाबादकडे येणाऱ्या ‘टू-जेट’ या विमानाला हवेत आग लागली. त्यामुळे विमानाचे एक इंजिन बंद करून वैमानिकाने ते पुन्हा हैदराबादला वळविले. या विमानात ५२ प्रवासी होते. या प्रकारामुळे ते घाबरले. सुदैवाने मोठा अपघात टळला. या विमानात प्रवासी म्हणून असणाऱ्या आमदार सतीश चव्हाण यांचे बंधू प्रदीप चव्हाण यांनी ही माहिती दिली.
सकाळी ११.३० वाजता हैदराबादहून औरंगाबादकडे येणाऱ्या ‘टू-जेट’ विमान उड्डाणानंतर ३५ मिनिटाने धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी आग लागल्याची बाब वैमानिकांच्या लक्षात आणून दिली. विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनमध्ये आग दिसून आल्यानंतर वैमानिकांनी ते इंजिन बंद केले आणि दक्षता म्हणून हैदराबादला पुन्हा विमान वळविले. दुपारी १च्या सुमारास ते हैदराबाद येथे उतरविण्यात आले. मात्र त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाची सोय करून देण्यात आली नाही. केवळ विमान रद्द झाले आहे, त्याची रक्कम ऑनलाईन जमा होईल असे सांगून कंपनीने हात झटकले. या प्रकारामुळे प्रवासी घाबरल्याचे चव्हाण यांनी सांगितले.