लढणारी माणसे

सुहास सरदेशमुख

दिवस सुरू होतो, तो किती किती करोनाबाधित झाले या आकडय़ासह. घरातून निघताना मनातील नियोजन बाजूला पडते. नवेच काम अंगावर पडते. प्रत्येक करोनाबाधित व्यक्तीचा संपर्क शोधणे, त्यांना चाचणीसाठी पाठविणे, नव्याने कोणी संपर्कात येऊ नये म्हणून संस्थात्मक विलगीकरण करणे अशी कामे करणाऱ्या चमूचे नेतृत्व करताना आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, सर्वेक्षणासाठी घेतलेले शिक्षण यांचे सतत मनोबल वाढवावे लागते. त्यामुळे कामाच्या वेळा सकाळी साडेआठ ते रात्रीपर्यंत अंथरुणाला पाठ लागेपर्यंत, हे अनुभव आहेत महापालिका आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीता पाडाळकर यांचे.

गेल्या काही दिवसांत करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील नमुने सकारात्मक येण्याचे प्रमाणही औरंगाबादमध्ये वाढत चालले आहे. त्यामुळे काम वाढणार, हा टप्पा तसा दृष्टिक्षेपात आहे. त्यामुळे रोजचा दिवस लढण्याचा, हे आता नक्की वाटत आहे, डॉ. पाडाळकर गेल्या काही दिवसांतील अनुभव सांगत होत्या.

करोनाबाधिताचा आकडा वाढला की त्या व्यक्तींची माहिती महापालिकेला दिली जाते, आणि मग डॉ. पाडाळकरांच्या चमूचे काम सुरू होते. तो भाग प्रतिबंधित करण्यासाठी पोलिसांना कळविणे, त्याच बरोबर त्या रुग्णाचे संपर्क शोधणे हे काम हाती घ्यावे लागते. अलिकडेच जिल्हा रुग्णालयातून २२ रुग्णांची सुटका झाली. त्यामुळे शहरातील सात भाग करोनामुक्त झाले. मात्र, काही भागात तो नव्याने वाढताना दिसतो आहे. त्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागातील कर्मचाऱ्यांना कामाला लावणे, ही कामे करताना लागण झालेल्या व्यक्तींचे संपर्क शोधणे हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे काम. हे काम जणू शोध लावण्या एवढेच क्लिष्ट. ज्या समतानगर भागात आता करोना पसरतो आहे, त्या भागातील करोना लागण झालेल्या व्यक्तीचा वावर खूपच अधिक होता, असे दिसून आले आहे. मार्च महिन्यात तो नागपूरला गेला होता. पण बोलून खरी माहिती येत नसल्याने प्रशासनाला अनेकदा संपर्क शोधण्यासाठी भ्रमणध्वनीचाही  आधार घ्यावा लागतो आहे.  लोक घरी थांबायला तयार नाहीत. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढते आहे. अशा कठिण परिस्थितीमध्ये महापालिकेचा आरोग्य विभाग काम करतो आहे. अत्यंत तुटपुंज्या मानधनाच्या भरवशावर आशा आणि अंगणवाडी कार्यकर्ती काम करते आहे. त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम यंत्रणेला करावे लागते. डॉ. पाडाळकर सांगत होत्या, ‘ एका बाजूला प्रत्यक्ष काम करणारी माणसे, दुसरीकडे माहिती गोळा करून ती वरिष्ठापर्यंत पोहोचविणे अशा दुहेरी भूमिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना कराव्या लागतात. त्यामुळे दिवस सुरू झाल्यानंतर सकाळी अर्धातास घराच्या छतावर व्यायाम, प्राणायाम एवढाच स्वत:चा वेळ.

घरातील सदस्यांचे पाठबळ असल्याने आणि दिवस संपेपर्यंत बऱ्याच आघाडय़ांवर काम करता येते.’ त्यांच्यासमवेत अपर्णा शेटे, डॉ. वंदना विखे, डॉ. माया जोगदंड, डॉ. स्मिता जळगीकर, डॉ. अर्चना राणे, डॉ. अमरज्योती शिंदे, डॉ. सुषमा धनवले, डॉ. प्ररेणा बडेरा, डॉ. प्रेमलता कराड आदी या कामांमध्ये आहेत.