जाहिरात मोठी, रोपांची खोटी!

दोन कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट कसेबसे पूर्ण होऊ शकेल, मात्र जाहिरातबाजी अधिक झाल्यामुळे रोपांची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. ती पूर्ण करता येणे जवळपास अशक्य असल्याचे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. यातही वड, पिंपळ ही झाडे नाहीतच. या वर्षी पहिल्यांदा वड आणि पिंपळाची रोपलागवड केली आहे. या वर्षी सीताफळ, जांभूळ आणि कडुनिंब या रोपांवरच भर दिला जाणार आहे. मराठवाडय़ातील लातूर उस्मानाबाद जिल्हय़ांत रोपांची कमतरता असल्याचे मुख्य वनसंरक्षक ए. आर. मंडे यांनी मान्य केले.

मराठवाडय़ात ४७ लाख ८४ हजार रोपे एकाच दिवशी लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. १ जुलै रोजी ही लागवड व्हावी म्हणून ३८ लाख खड्डे तयार करण्यात आले आहे. रोपांची कमतरता मात्र जाणवत असल्याचे अधिकारीही मान्य करतात. रोपलागवड करावी याची जाहिरात एवढी झाली आहे, की वेगवेगळय़ा ठिकाणांहून रोप मागणी होत आहे. खासगी रोपवाटिकांमधून रोपे मिळू शकतात काय, याची चाचपणी केली जात आहे. अचानकपणे वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आल्यामुळे खासगी रोपवाटिका मालकांनी प्रतिरोप दराची किंमत ७ रुपयांवरून २० रुपयांपर्यंत वाढवली आहे. या वर्षी नीलगिरी, सुबाभळ, ग्लिरीसीडिया, पर्किंनसोनिया ही रोपे लावण्यास वन विभागाने बंदी घातली आहे. झपाटय़ाने वाढणारी ही रोपे फक्त काही काळच हिरवळ निर्माण करतात. मात्र या झाडांचा काहीएक उपयोग होत नाही. त्यामुळे सीताफळ, जांभूळ आणि कडुनिंब या झाडांवर भर दिला जात आहे. एका हेक्टरमध्ये पूर्वी १ हजार २०० ते १ हजार ४०० रोपे वनक्षेत्रात लावली जात असत. आता ते प्रमाण कमी करण्यात आले आहे. हेक्टरी ८०० ते ९०० रोपे लावली जाणार आहेत. सामान्यत: वन विभागाकडून नागरी क्षेत्रात रोपे दिली जात नाहीत. या वर्षी मराठवाडय़ात वन विभागाच्या जमिनीवर ७३ लाख ९९ हजार रोपे लावली जाणार आहेत. त्यातील २९ लाख रोपे १ जुलै रोजी लावण्याचे ठरविले आहे. या पुढे संस्थांनी रोपे मागितल्यास ती देण्यास असमर्थ ठरू, असे वन विभागातील अधिकारी सांगतात. सामाजिक वनीकरण विभागामार्फत केवळ १ लाख १९ हजार रोपे लावली जाणार आहेत. खरेतर या विभागानेच रहिवासी क्षेत्रात रोपे लावणे आवश्यक आहे, मात्र त्यांच्याकडे रोपांची कमतरता आहे. वृक्षारोपणाचे १ तारखेचे उद्दिष्ट कसेबसे पूर्ण होईल, मात्र त्यानंतर रोपे उपलब्ध होणार नाहीत.