पेट्रोल पंपांचा वापर पंतप्रधानांनी स्वतःच्या प्रसिध्दीसाठी केला असून असा प्रकार यापूर्वी कधीही पाहिला नाही, असा थेट आरोप विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी कन्नडच्या जाहीर सभेत केला.

यावेळी पवार यांनी भाजपा सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. साडेचार वर्षांत भाजपा सरकारने लोकांना फक्त गाजरंच दाखवण्याचे काम केले आहे. पाच राज्यांनी या सरकारला नाकारले आहे. सर्वसामान्य माणसाला चांगली वागणूक मिळत नसल्यानेच हा बदल झाल्याचे ते म्हणाले.

शेतकर्‍यांचे कैवारी म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी ७१ हजार कोटीची कर्जमाफी करुन दाखवली आहे. शरद पवार यांनी शेतकऱ्यांना शेतीला आधारभूत किंमत मिळवून दिली होती. परंतु, आज हे लोकांना काही देत नाही नुसत्या घोषणा सुरु करण्यात हे सरकार पटाईत आहे, अशी कोपरखळीही केली.

‘चाय पे चर्चा’ आणि ‘मन की बात’मधून आमच्या समस्या सुटणार आहेत का, अशी विचारणाही पवार यांनी केली. या देशातील एक लाख तरुणांच्या नोकर्‍या या २०१८ मध्ये गेल्या. देण्याचे सोडा तरुणांच्या नोकर्‍या घालवल्या असल्याचा आरोप त्यांनी केला.

आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाचे सरकार आहे. मग आरक्षण मागणार्‍या समाजांना अद्याप न्याय का देत नाही असा जाबही पवार यांनी सरकारला विचारला.