13 December 2018

News Flash

‘कविता म्हणजे माझ्या जगण्याची अपरिहार्यता’

कविता ही जगण्याची अपरिहार्यता असून, माझी जैविक गरज आहे, असे कवयित्री सुचिता खल्लाळ यांनी सांगितले.

कोणत्याही अभिजात कलावंताची प्रेरणा ही उपदेशवजा, अनुकरणात्मक गोष्टींतून येत नसते तर कलासक्त कलावंताची प्रेरणा दु:खाच्या अभिजाततेतून, सोसण्यातून मिळते. कविता ही जगण्याची अपरिहार्यता असून, माझी जैविक गरज आहे, असे कवयित्री सुचिता खल्लाळ यांनी सांगितले.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या ‘स्वागत’ उपक्रमात नांदेड येथील प्रसिद्ध कवयित्री सुचिता खल्लाळ यांनी आपला लेखनप्रवास मांडला. मराठवाडा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, प्रा. दादा गोरे आदींची उपस्थिती होती. मनोगतापूर्वी खल्लाळ यांच्या ‘स्त्रीकवितेचं भान : काल आणि आज’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. ‘पायपोळ’, ‘तहहयात’ या कवितासंग्रहानंतर खल्लाळ यांचा हा समीक्षाग्रंथ प्रकाशित झाला. खल्लाळ म्हणाल्या, की लेखनात उंची गाठायची असल्यामुळे सतत लेखन करीत राहिले. वसमत शहरात बालपण गेले. येथील नगरपालिका वाचनालयातली धार्मिक ग्रंथ आई वाचत असे. ते संस्कार होत गेले आणि याच काळात वाचनाला शिस्त लागत गेली. वृत्तपत्रे व पुस्तके वाचण्याचा वडिलांचा आग्रह असे. पण ते अभ्यासासाठी. आपल्या मुलांनी लेखक वगरे व्हावे असे स्वप्न त्या काळात कोणा मध्यमवर्गीय पालकांचे असणे शक्य नव्हते, पण यातून वर्तनाला अभ्यासू शिस्त लागत गेली. माझे वक्तृत्व माझ्यातल्या कवित्वाची प्रेरणा ठरले असे वाटते. कोणतेही सृजन प्रस्थापित वाटांशी केलेली बंडखोरी असते. बाहेरची पडझड कलावंत तेव्हाच चितारू शकतो जेव्हा आतली पडझड अनुभवण्याची अंतर्मुखता, संयम त्याच्यात असेल.
कवी व्यंकटेश चौधरी यांनी प्रास्ताविक केले. दर्जेदार लेखन करणाऱ्या नवोदित कवी-साहित्यिकांचा शोध घ्या, असे आवाहन ठाले-पाटील यांनी केले.

First Published on January 29, 2016 1:35 am

Web Title: poetess suchita khallal book published
टॅग Book Published