चोरटय़ांकडून पोलिसांच्या दिशेने गोळीबार

हिंगोली येथून सेनगावच्या स्टेट बँक ऑफ हैदराबादची ४० लाखांची रक्कम चारचाकी वाहनाने नेली जात असताना चोरटय़ांनी शिपायाच्या अंगावर वार करून ती पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेगाव खोडके येथील ग्रामस्थ आणि पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले. त्यांच्याकडून ३९ लाख रुपये रोख व एक पिस्तूल व तीन खंजीर जप्त करण्यात आले. जनार्धन रामराव वाघमारे (वय २५, रा. भांडेगाव), राजेंद्रसिंग महिपालसिंग बावरी (वय २५, रा. बडनेरा, जि. अमरावती) व बाशासिंग अजबसिंग टाक (वय ३०, रा. वडवणी, जि. अमरावती) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबारही केला होता.

स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँकेची सेनगावात शाखेत नेहमीप्रमाणे ४० लाखांची रक्कम िहगोली येथून आणली जात होती. बुधवारी दुपारी १२च्या सुमारास इंडिका कारमधून (एमएच३८/६०४५) बँक कर्मचारी रक्कम घेऊन येत असताना बँकेसमोर उभे असणाऱ्या ५ जणांनी बँकेच्या शिपायावर चाकूचा हल्ला करून त्याला जखमी केले व ४० लाखांच्या रकमेची बॅग आरोपींकडे असलेल्या टाटा सुमोमध्ये (एमएच३८/२३७) टाकून आरोपींनी पळ काढला.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच जिल्हाभर नाकेबंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांनी दिले. सेनगावातील नागरिक व पोलिसांनी चोरटय़ांच्या टाटा सुमोचा पाठलाग केला. शेगाव खोडके पुलाजवळ अनेक लोक जमल्याचे पाहून आरोपींनी पळ काढला. शेगावातील ३०० ते ४०० नागरिकांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी सुमारे ३ कि.मी. चोरटय़ांचा पाठलाग करून त्यांना म्हाळशी शिवारात पकडले. तत्पूर्वी आरोपींनी पोलीस नायक खंडेराव नरोटे यांच्या दिशेने तीन गोळ्याही झाडल्या होत्या. मात्र, त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पोलिसांनी तीन चोरटय़ांना ३९ लाखासह ताब्यात घेतले. ४० लाखांपकी १ लाखाची रक्कम इतर पळून गेलेल्या आरोपीकडे असावी, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे.

अटक केलेले तिन्ही आरोपी मोक्का अंतर्गतचे गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. यातील जनार्धन वाघमारे हा भांडेगाव येथील रहिवासी असून त्याच्यावर िहगोली ग्रामीण पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला दोन वर्षांची शिक्षा झाली होती. तो नुकताच कारागृहातून बाहेर पडला होता. इतर काही दिवसांसाठी सुट्टीवर (पॅरोलवर) बाहेर आले होते. त्यांनी वापरलेले वाहन हे बहुतेक अकोला येथून चोरल्याचा पोलिसांना संशय आहे.

या प्रकरणात पोलिसांना शेगाव खोडके व सेनगाव येथील ग्रामस्थांनी मोठी मदत केली. सेनगाव ते शेगाव खोडकेपर्यंत पोलिसांनी पाठलाग केला. चोरटय़ांना चाहूल लागल्याने ते पुलावर गाडी उभी करून पळण्याच्या प्रयत्नात होते. परत शेगाव येथील ग्रामस्थ व पोलिसांनी सुमारे ३ कि.मी. चोरटय़ांचा पाठलाग केला. त्यांना म्हाळशी गावाच्या शिवारात पकडण्यात पोलिसांना यश आले. ग्रामस्थांनी केलेल्या परिश्रमामुळे पोलिसांना हे काम सोपे झाले, त्या ग्रामस्थांचे कौतुकही त्यांनी केले. पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये इमरान, बेडके, गायकवाड, जमीर, यांना रक्कमेची थली (बॅग) आरोपीच्या ताब्यातून घेण्यात यश आले.