औरंगाबाद :  एसबीआय बँकेच्या विविध ठिकाणच्या एटीएम यंत्रात बिघाड करून १३ लाख ९२ हजार रुपये काढणाऱ्या तिघांना सायबर पोलिसांनी नागपूर येथील कारागृहातून गुरुवारी अटक केली. तिन्ही आरोपी हे हरयाणातील असून त्यांना चार ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. मुळे यांनी दिले आहेत. इक्बाल खान पंछी (वय ३१), अनिस खान गफुर अहमद (२६) आणि मोहम्मद तालीब उमर मोहम्मद (२३) अशी आरोपींची नावे आहेत.

प्रकरणात एसबीआय बँकेचे सुहास दिगंबर कुलकर्णी (४७) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, १० जून रोजी फिर्यादी हे कर्तव्यावर असतांना त्यांना बँकेच्या विविध शाखेतून फोन आले, की तुम्ही अ‍ॅडमीन स्लीपच्या तुलनेने फिजिकल कॅश कमी का भरली. त्यामुळे फिर्यादीने चौकशी केली असता, बँकेच्या एटीएम मशीनमधून एटीएम लॉग मध्ये अ‍ॅटोरिव्हर्स झाले. हार्डवेअरमधील यांत्रिक बिघाडामुळे हे झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी हर्सुल, टाउन सेंटर, समर्थनगर,पीबीबी, अमरप्रित हॉटेल, माळीवाडा येथील एटीएम मशीनचे सीसीटिव्ही फुटेज तपासले असता वरील आरोपींनी एटीएमचे सेन्सॉर व हार्डवेअर निकामी करून तब्बल १३ लाख ९२ हजार रुपये काढल्याचे समोर आले. प्रकरणात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली.