अभ्यासाव्यतिरिक्त मोबाइलशी मुलांची होणारी घट्ट मैत्री पाहून पालकांच्या हृदयाचे ठोके मात्र वाढू लागले आहेत. घरोघरी मोबाइलधारी मुले हेच चित्र आहे. त्यात आता ब्ल्यू व्हेल गेम बंदीनंतर डेट-नेट हे नवे नाव धारण करून अवतरलेल्या गेमनंतर तर पालकांच्या चिंतेत अधिकच भर पडली असल्याचे पाहून हॅकर्स (पोलिसांचे मित्र) आता मुलांच्या प्रत्येक हालचालीची माहिती देणारे अ‍ॅप्लिकेशन्स बनवण्यात गुंतले आहेत.

ब्ल्यू व्हेल या मोबाइलवरील गेमचे लोण महानगरातून ग्रामीण भागापर्यंत पोहोचून मुले आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलतात. संसदेतही ब्ल्यू व्हेलचा मुद्दा उपस्थित झाला. अखेर त्या गेमवर बंदी आणली खरी; पण हॅकर्सच्या मते हाच गेम अगदी नव्या रूपात पुन्हा डेट-नेट नावाने पुढे आला आहे.  सी-माय-बेबी, लॉक सेंटर, नेटवर्क इन्व्हेंटरी असे अ‍ॅप्लिकेसन्स तयार असून या माध्यमातून मुलाने आपल्या अपरोक्ष काही पाहिले आहे का, याची माहिती संक्षिप्त रूपात पाहता येते. मोबाइल डेटामध्ये इंटरनेट वापरावरही लक्ष ठेवता येते. नेटपॅक हाही एक पर्याय आहे. वायफाय सुरक्षितताही राखता येते. मोबाइलसह संगणक, लॅपटॉपसाठीही हेच पर्याय आहेत. मुलांकडील (अ‍ॅन्ड्रॉईड) मोबाइलमधील सेटिंगमध्ये असलेल्या हाईडअ‍ॅप्स या ठिकाणी जाऊन त्याने काय पाहिले, याची माहिती घेता येते. अ‍ॅन्टिव्हायरस ठेवलेले अधिक चांगले. त्यात मुलांसाठी म्हणून चाइल्ड प्रिव्हेन्सिव्ह लॉक पद्धत असते. त्यामुळे इंटरनेटवरील गेम, पॉर्न व्हिडिओ डाऊनलोड होऊ शकत नाहीत, असे हॅकर्स (पोलीस मित्र) वैभव कुलकर्णी यांनी सांगितले.

१४ ते २३ वयोगटातील मुलांना मोबाईलचे व्यसन

औरंगाबादेतील १४ ते २३ वयोगटातील असंख्य मुले मोबाइल गेमच्या आहारी गेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची गेम, पॉर्न गेम, पॉर्न व्हिडिओ, ऑनलाइन सट्टा, ऑनलाइन जुगार मुलांमध्ये खेळला जात आहे. ते उघडकीस आले तर मुले, आम्ही उडवून टाकतो, म्हणत असल्यामुळे पोलिसात किरकोळ बाब या सबबीखाली पालकांकडून तक्रार दाखल होत नाही. परिणामी मुले घरकोंबडे होत आहेत. योग्यरीत्या संवाद साधून समजून सांगितले तर ते ऐकतात. त्यातील कायद्याची बाजू सांगत गुन्हाही दाखल होऊ शकतो, हे त्यांच्या लक्षात आणून दिले तर ते ऐकतीलही. मुलांना मैदानी खेळाकडे घेऊन जावे लागेल. तरच ते मोबाइलच्या व्यसनातून बाहेर पडतील.

– वैभव कुलकर्णी, हॅकर्स.