औरंगाबाद येथील मिटमिटा येथे बुधवारी कचरा प्रश्नावरून तुफान राडा झाला. त्यानंतर कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांनी नागरिकांच्या घरावर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून, त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून कचरा प्रश्न पेटला असून बुधवारी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील मिटमिटा गावाजवळ स्थानिकांनी आंदोलन केले होते. यावेळी संतप्त नागरिकांनी कचरा गाड्यांवर दगडफेक केली. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रूधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यानंतर जमावाने पोलिसांच्या गाड्यांना लक्ष्य केले. यात १२ पोलीस जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता.

त्यानंतर पोलिसांकडून कोम्बिग ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी नागरिकांना मारहाण करताना आणि दगडफेक करतानाचे चित्रण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्याचे व्हिडीओ आज व्हायरल झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. दगडफेक जाळपोळ प्रकरणी १२०० नागरिकांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोम्बिगच्या नावाखाली दगडफेक करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.