पोलिस नियंत्रण कक्षात कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍याच्या सुनेने स्वत:च्या वाढदिवशीच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीचाही जीव घेतला. बेगमपुरा येथे रविवारी दुपारी ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, अमृता किशोर मुळे (वय २२) व अवंतिका (वय, २.५ वर्षे, रा. थत्ते हौद, बेगमपुरा) अशी मृतांची नावे आहेत. अमृताचा आज वाढ दिवस होता. तिचा पती सहा महिन्यांपूर्वीच बिबी का मकबरा येथील कार्यालयात पार्किंग सुपरवायझर म्हणून नोकरीला लागला होता.

अमृताने रविवारी दुपारी घरातील लोखंडी अॅंगलला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. संध्याकाली साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी अमृताने आपली अडीच वर्षांची मुलगी अवंतिका हिला संपवले.

संध्याकाळी साडे पाच वाजता तिचा पती किशोर कामावरुन घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अमृता दरवाजा उघडत नाही म्हणून त्याने दाराच्या फटीतून घरात पाहिले तर त्याला अमृता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर किशोरने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि पोलिसांना याची माहिती दिली. किशोरचे वडिल दिलीप मुळे हे औरंगाबाद पोलिसांच्या नियंत्रण कक्षात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करतात.

दरम्यान, दोन्ही मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मात्र, अमृताच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. बेगमपुरा पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.