औरंगाबाद :  बंदोबस्ताचे कर्तव्य मिळाल्यानंतर घरी जाणाऱ्या पोलिसाला अडवून तिघांनी मारहाण करत लुटले. ही घटना ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री बाबा पेट्रोल पंप ते एलआयसी कार्यालयाच्या परिसरात घडली. या प्रकरणी वेदान्तनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नितीन भास्कर वक्ते याला अटक केली आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयात उभे केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी मंगला मोटे यांनी रविवापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नितीन वक्तेसोबत दीपक रमेश वक्ते व गौतम राम कदम हे दोघेही होते. या दोघांनाही अटक करणे बाकी असून अन्य कोणी साथीदार होते का, आदी माहितीसाठी नितीनला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयापुढे करण्यात आली होती.

पोलिसाला मारहाण

पोलीस कॉलनीत राहणाऱ्या चालकासह त्याच्या आई व वडिलांनी मिळून एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख वसीम शेख उस्मान, असे मारहाण करणाऱ्या चालकाचे नाव आहे. त्याने व त्याच्या आई-वडिलांनी मुख्यालयातील पोलीस नाईक केशव दीपक जाधव यांना मारहाण केली. जाधव हे वरिष्ठांच्या आदेशाने पिराजी गायकवाड यांच्यासोबत वसाहतीतील स्वच्छतेचे काम करत होते. वाहने इतरत्र लावण्याचे त्यांना आदेश होते. त्यासाठी चालक शेख याला सांगताच त्याने मारहाण केल्याची तक्रार जाधव यांनी नोंदवली. शेख याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. तारे यांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहायक सरकारी वकील आमेर काझी यांनी आरोपीला कोठडी देण्याची विनंती केली.