|| सुहास सरदेशमुख

आंदोलनाभोवती ‘जलावरण’ ; पाठिंब्यासाठी राज्यभरातून प्रमुख नेत्यांची उपस्थिती

औरंगाबाद :  पक्षांतर्गत निर्माण झालेली खदखद आणि ‘माधव’ सूत्राच्या भोवती फिरणारी राजकीय अपरिहार्यता यातून सोमवारी औरंगाबाद येथे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलनास जलसमस्यांचे आवरण देण्यात भाजपच्या नेत्यांना यश आल्याचे दिसून आले. हे उपोषण गोपीनाथ प्रतिष्ठानच्यावतीने घेण्याचे पूर्वी पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्यावतीने हे उपोषण असल्याचे सांगितले आणि सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पक्षाचे सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला. शिवाय मराठवाडय़ातील बहुतांश आमदार आणि खासदारांनी उपोषणस्थळी येऊन पाणीप्रश्नाला पाठिंबा असल्याचे जोरकसपणे सांगितले.

पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करता येतील अशी मुलाखत देऊन पंकजा मुंडे यांनी नवी संघटना स्थापून सामाजिक कार्य करण्याची घोषणा केली होती. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने भविष्यात वेगवेगळे प्रश्न हाताळले जातील, असे त्यांनी सांगितले होते. यासाठी २७ जानेवारी रोजी आंदोलन करू, अशी घोषणा त्यांनी केली होती. हे उपोषण गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने की भाजपच्यावतीने, असा प्रश्न कार्यकर्त्यांच्याही मनात होता. त्याची सोडवणूक कोअर कमिटीतील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर करण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या पाणी समस्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत भाजपच्यावतीने हे आंदोलन पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होईल, असे जाहीर करण्यात आले. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला मानणारा मोठा गट मराठवाडय़ात आहे. ‘माधव’ सूत्राभोवती एकवटलेली शक्ती भाजपच्यामागे नेहमीच उभी राहते, असे वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये स्पष्ट झाले होते. या अपरिहार्यतेतून भाजपच्या नेत्यांनीही  पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला नवी झळाळी मिळवून दिली असल्याचे सोमवारच्या आंदोलनातून स्पष्ट झाले.

 पाण्याचे गंभीर प्रश्न आणि भाजपा

मराठवाडय़ातील सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्रपणे एक हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी भाजपचे नेत्यांकडून २७ जानेवारी रोजीच्या आंदोलना दरम्यान केली.  कोकणातील दमनगंगा, नार-पार-पिंजाळ व वैतारणा खोऱ्यातून २६४ अब्ज घनफूट पाणी समुद्रात जाऊन मिसळते. त्यातील ११५ अब्जघनफूट पाणी अप्पर वैतरणा धरणातून गोदावरी खोऱ्यात आणावे अशी मागणी करण्यात आली होती. दमणगंगा-पिंजाळ हा नदीजोड प्रकल्प करावा, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर जलयुक्त शिवारच्या कामाला स्थगिती देऊ नये व मराठवाडा वॉटर ग्रीडचे काम तातडीने हाती घ्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. सरकारवर टीका न करता लक्ष वेधण्यासाठी म्हणून हे उपोषण आंदोलन असल्याचे पंकजा मुंडे यांनी उपोषणाच्या सुरुवातीला आणि समारोपप्रसंगी सांगितले. संवेदनशील मुख्यमंत्री असा उल्लेख करून केवळ मागास भागाच्या समस्या लक्षात आणून देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हे आंदोलन करताना मी भाजपची कार्यकर्ती असल्यामुळे पक्षाच्यावतीने हे आंदोलन हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पाणी समस्यांचा भोवताल अधोरेखित करत भाजपने पक्ष आणि पाणी समस्या यांचा मेळ घालत पंकजा मुंडे यांच्या उपोषणाला बळ दिले.

संघर्षांच्या वेळी पंकजा

‘पंकजा मुंडे तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’ असे म्हटले जाते, पण ‘पंकजाताई आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ ही घोषणा त्यांच्याबाबतीत लागू व्हायला हवी, अशी टिप्पणी करत  खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी भाषणाला सुरुवात केली. जलयुक्त शिवार ही योजना कशी यशस्वी होती, हे सांगत त्यांनी भाषण केले. त्यांच्या त्या भाषणापूर्वीच्या टिप्पणीचा धागा पकडत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर म्हणाले, संघर्षांच्या वेळी जसे ताईंचे नाव घेतले जाते, तसे एरवीदेखील ते घ्यायला हवे. याची दक्षता पक्षाचे सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर घेतील. ‘संघर्षां’च्या घोषणेला उपोषणस्थळी लावण्यात आलेला राजकीय अर्थ राजकारणाची दिशी पुरेशी स्पष्ट करणारा होता. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. त्यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री म्हणून मराठवाडय़ाला पाण्यासाठी कोणत्या आणि कशा योजना दिल्या याची माहिती दिली. जलयुक्त शिवारसारखा कार्यक्रम रद्द केला जाऊ नये. त्याचबरोबर मराठवाडय़ाच्या हक्काचे पाणी त्यांना द्यायला हवे, अशी भूमिकाही मांडली. मराठवाडा दुष्काळमुक्त झाला पाहिजे, असे सांगत त्यांनी राज्य जलआराखडा आणि जलपरिषदेच्या बैठका घेऊन कसे प्रयत्न केले याची माहिती उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.

ल्लपंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला मानणारा मोठा गट मराठवाडय़ात आहे. ‘माधव’ सूत्राभोवती एकवटलेली शक्ती भाजपच्यामागे नेहमीच उभी राहते, असे वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये स्पष्ट झाले होते. या अपरिहार्यतेतून भाजपच्या नेत्यांनीही  पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला नवी झळाळी मिळवून दिली असल्याचे सोमवारच्या आंदोलनातून स्पष्ट झाले.