औरंगाबाद शहरातील दमडीमहल परिसरात श्रीराम पवार यांचे घर आहे. ते अतिक्रमण असून तात्काळ हटवण्यात यावे अशी मागणी एमआयएमने स्थायी समितीच्या बैठकीत केली. त्यानंतर यावर सभापतींकडून कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र, आपण पन्नास वर्षांपासून येथे राहत असून टाऊन प्लॅनिंगचा मुद्दा पुढे करत देण्यात आलेले कारवाईचे आदेश चुकीचे असल्याचा दावा श्रीराम पवार यांच्याकडून केला जात आहे. काल पालिका अधिकाऱ्यांनी श्रीराम पवार यांच्या घरावर अतिक्रमणावर कारवाई केली. मात्र, आता त्यावरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालिकेचे अतिक्रमण पथक कारवाईसाठी गेल्यानंतर श्रीराम पवार आणि त्यांच्या कुटुंबियांकडून विरोध झाल्याने कारवाई मंदावली होती. त्यामुळे एमआयएमचे नेते गफ्फार कादरी यांनी कारवाईच्यावेळी घटनास्थळी धाव घेत नगरसेवकांना खास ऑर्डर सोडल्या. तसेच अधिकाऱ्यावर दबाव टाकत कारवाई करण्यास भाग पाडले. कारवाई थांबवण्यासाठी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिल्लीहून फोन केला. मात्र, कारवाई काही थांबली नाही. त्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक समितीने यामध्ये उडी घेतली असून त्यांच्या प्रतिनिधींनी याप्रकरणी आज महापौरांची भेट घेतली.

कारवाईसाठी दबाव वाढवणाऱ्या एमआयएम नगरसेवकांविरोधात तक्रार देणार असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, शिवसेना शहरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी देखील याच प्रश्नावर महापौर यांची भेट घेतली. त्यानंतर महापौरांनी संबंधीत अधिकाऱ्यांकडून दोन दिवसांत खुलासा मागवला असून त्यानंतर कारवाईचा इशारा दिला आहे. बुधवारी कारवाई झाल्यानंतर आज पालिका वर्तुळात घडलेल्या घडामोडीमुळे येत्या काळात श्रीराम पवार यांच्या घराच्या अतिक्रमण मुद्द्यावर राजकारण तापण्याची शक्यता आहे.