उदगीर शहरातील बनशेळकी तलावामधील गाळ लोकसहभागातून काढण्याचा विचार दहा तरुणांनी केला. त्यास आता चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असून या मोहिमेने चांगला वेग घेतला आहे.
उदगीर शहराला पाणीपुरवठा करणारा बनशेळकी तलाव कोरडाठाक पडला होता. मनोज पुदाले, उत्तम मोरे, रवी मळगे, मनोज धावडे, मोतीलाल डोईजोडे, शंकर मुक्कावार, रवी हसरगुंडे या तिशीतील मित्रांनी या तलावातील गाळ काढण्यासाठी काही केले पाहिजे असा विचार केला. त्यातून मित्रांच्या मदतीने एका दिवसात ५ लाख रुपये उभे केले अन् दोन दिवसांतच गाळकाढणी मोहिमेस प्रारंभ केला.
गेल्या १५ दिवसांत तीन पोकलेन, दोन जेसीबी, ४० हायवावा (मोठय़ा मालमोटारी) व शेकडो ट्रॅक्टरच्या मदतीने गाळकाढणी मोहीम वेग घेत आहे. ‘आधी केले अन् मग सांगितले’ या पद्धतीने तरुणांनी हे काम केले. काम सुरू झाल्याचे लक्षात येताच गावासह आसपासच्या गावांतील लोक काम पाहण्यास येऊ लागले. काम पाहून तेथेच मदत देण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या २० किलोमीटर अंतरावरील नेत्रगाव, बनशेळकी, तोंडार, हैबतपूर, तिवटघाळ, माळेवाडी, बामणी आदी १५ गावांतील शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जाण्याची तयारी दाखवली.
शेतकऱ्याला माती वाहून जाताना १४० रुपये प्रतिकिलोमीटर दराने ट्रॅक्टरचे भाडे द्यावे लागते. ट्रॅक्टरमध्ये भरून देण्यासाठी लागणारा २५० रुपयांचा खर्च गाळकाढणी मोहिमेतून देण्यात येतो. आतापर्यंत सुमारे ३ हजार टिप्पर माती उचलण्यात आली. तलावात ५०० फूट लांब व ८ फूट खोल चर खोदण्यात आला. त्यात पाणी जमा झाले. नगरपरिषदेने साडेसात अश्वशक्तीचा पंप लावून येथून २४ तास पाणी उचलणे सुरू केले. या वर्षी उदगीर पालिका शहराला महिन्यातून एकदाच नळाला पाणी देऊ शकत होती. पाणीटंचाईतून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी तरुणांनी मोहीम सुरू केली. गेल्या १५ दिवसांपासून रोज किमान २ लाख रुपयांचा लोकसहभाग जमा होत आहे. अशा प्रकारे आतापर्यंत सुमारे ३० लाख रुपयांचे काम पूर्ण झाले. अजून केवळ २५ टक्केच गाळ काढता आला असून आणखी ७५ टक्के काम होणे बाकी आहे.
सुमारे १५० एकर परिसराचा हा तलाव असून गेल्या अनेक वर्षांत यातील गाळ काढला गेला नाही.