आधुनिक तंत्रज्ञानामुळे संपर्काची माध्यमे वेगवान झाल्याने टपालामार्फत येणारी पत्रे बंद झाली. त्यामुळे टपाल विभागानेही आता आधुनिकतेची कास धरली आहे. थेट गाव आणि घरापर्यंत सेवा देणाऱ्या पोस्टमनमार्फत विविध बचत योजना आणि ऑनलाईन खरेदीपर्यंत कामे सुरू केली आहेत. आता मुख्य ठिकाणी किराणा मालापासून सौंदर्यप्रसाधनापर्यंत वस्तूंचे विक्री केंद्र उभारण्याचा निर्णय या विभागाने घेतल्याने पोस्टासह पोस्टमनलाही अच्छे दिन येणार आहेत.
केंद्र सरकारच्या टपाल कार्यालयांमधून येणाऱ्या पत्राद्वारेच संपर्क होत असे. त्यात तातडीची तार हे वेगवान संपर्काचे माध्यम असल्याने गावागावात घरापर्यंत जाणारी सरकारची यंत्रणा म्हणजे टपाल कार्यालय झाली. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाने संपर्काची माध्यमे बदलून वेगवान झाली. एका क्षणात जगाच्या पाठीवर कोठेही संपर्क करणारी साधने उपलब्ध झाल्याने टपाल कार्यालयातून येणारी पत्रे कमी झाली. मध्यंतरीच्या काळात टपाल कार्यालयातील कामकाज पूर्ण बंद पडण्याच्याच मार्गावर आले होते. मात्र, सरकारने देशभर सर्वत्र असलेल्या टपाल कार्यालयांच्या यंत्रणेचा आधुनिक पद्धतीने उपयोग करण्यास सुरुवात केली. त्यातून कोअर बँकिंग, ऑनलाईन खरेदी, जीवन विमा, बचत खाते अशा योजना सुरू केल्यानंतर टपाल यंत्रणेला काम लागले. सर्वसामान्य जनतेचाही विश्वास अधिक मजबूत झाला.
दरम्यान, केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनधन, सुकन्या समृद्धी, अटल पेन्शन, जीवन विमा या योजनाही याच खात्यामार्फत सुरू झाल्या. टपाल वाहतुकीसाठी पूर्वी पोस्टमनला केवळ सायकल असे. आता पोस्टमनला दुचाकी वाहन देण्याचा निर्णय झाला आहे. टपाल वाहतुकीसाठी तीन चाकी रिक्षाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मोठय़ा प्रमाणात ऑनलाईन खरेदी होत असल्याने आलेल्या वस्तूंचे वाटप करण्यासाठी पोस्टमनला आधुनिक सुविधा पुरवल्या जात आहेत. याच धर्तीवर आता टपाल खात्याच्या मुख्यालय ठिकाणी विविध वस्तूंचे विक्री केंद्र उघडण्याचा निर्णय या खात्याने घेतला असून किराणा मालापासून सौंदर्यप्रसाधनापर्यंत वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे आता या खात्याला आणि पोस्टमनला अच्छे दिन येणार आहे, हे मात्र निश्चित.