‘महापोर्टल’ परीक्षेतील अनेक घोळ  समोर आल्यानंतरही तलाठी पदाची भरती पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पात्र ५६ उमेदवारांची कागदपत्रेही प्रमाणित करण्याची प्रक्रिया पार पडली. मात्र, करोनासाथ आणि टाळेबंदी ही कारणे पुढे करत तलाठी पदावरील पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली जात नसल्याने अनेक जण वैतागले आहेत. राज्यातील बाकी जिल्ह्यात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात ही कारवाई पूर्ण होत नसल्याने ५६ हून अधिक जण हैराण आहेत.

राज्यात सुमारे १८०० तलाठी पदांसाठी जून-जुलै २०१९मध्ये  ‘महापोर्टल’ मार्फत परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांचा दर्जा योग्य असल्याचा दावा करत राज्यातील इतर अनेक जिल्ह्यात पात्र उमदेवारांना नियुक्तीपत्रही देण्यात आले. या पदासाठी १९ मार्च रोजी निवड यादी लावण्यात आली. जळगाव, पुणे,  नाशिक यांनी टाळेबंदीच्या काळात पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात ही प्रक्रिया रखडली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी उदय चौधरी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचीही उमदेवारांनी भेट घेतली. मात्र, नवीन नियुक्ती करण्याबाबत ४ मे २०२०च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन मागविले आहे. ते येईपर्यंत नियुक्ती दिली जाणार नाही, असे सांगण्यात येत आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये नियुक्ती दिली जात असताना औरंगाबादमध्ये अशी अडवणूक कशासाठी असा सवाल केला जात आहे. या अनुषंगाने बोलताना उमेदवार म्हणाले,की गेली चार वर्षे अभ्यास करून ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सर्व कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. मे महिन्यात नवी भरती करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, आमची परीक्षा आणि त्याचा निकाल मार्च महिन्यात लागला आहे. भरती प्रक्रिया जुनी असताना नव्याने मार्गदर्शन मागविण्याची गरज काय होती? महसूल सचिव आणि वित्त सचिवांनाही याबाबत उमदेवारांनी तक्रारी केल्या आहेत. नियुक्त पत्र देण्याबाबत वेगवेगळया जिल्ह्यात वेगवेगळी भूमिका घेतली जात असल्यानेही उमदेवार हैराण आहेत.