महापालिकेत अधिकारी पदाधिकाऱ्यांचा वाद चिघळला

रस्त्यांवरील खड्डय़ांसंदर्भात चर्चा करून उपाययोजना करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह अधिकाऱ्यांनी सभात्याग केल्याने गदारोळ झाला. महापालिकेतील सर्व अधिकारी ‘मोटे चमडी के है’ असे वक्तव्य केल्याने नाराज आयुक्त बकोरिया सभेतून उठून गेले. त्यांच्या पाठोपाठ इतर अधिकारीही निघून गेल्याने अधिकारी व पदाधिकाऱ्यांतील वादाला नव्याने तोंड फुटणार आहे.

शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोठे खड्डे असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेला फटकारले आहे. ३० सप्टेंबपर्यंत खड्डे बुजवा, असे आदेश दिले आहेत. खड्डय़ांच्या प्रश्नावर नागरिक दररोज महापालिकेच्या नावाने खडे फोडत असतात. त्याची दखल घेतली जात नाही, असा समज निर्माण झाला आहे. त्यावर चर्चा करून उपाय काढता यावा म्हणून मंगळवारी महापालिकेत विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. काही वेळ शहरातील रस्त्यांवर चर्चा झाली. सांगितलेली कामे होत नाहीत. संचिका गायब होतात, असे आरोप या वेळी काही नगरसेवकांनी केले. जाफर शेख बोलायला उठले आणि त्यांनी महापालिकेतील सर्व अधिकारी असंवेदनशील असल्याचे सांगण्यासाठी सवार्ंकडे हात दाखवून ‘इन सब अधिकारिओं की चमडी मोटी हो गई है’ असे म्हटले. यावर आयुक्त बकोरिया यांनी महापौर त्र्यंबक तुपे व उपमहापौरांकडे आक्षेप नोंदविला. हाताचा इशारा करून हे चूक आहे, असे ते म्हणत होते. महापौर आणि उपमहापौरांकडून त्यावर काही प्रतिक्रिया न आल्याने आयुक्त बकोरिया उठले आणि त्यांनी सभागृहाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. ते निघून जात आहेत असे म्हटल्यावर सर्व नगरसवेक महापौरांच्या आसनासमोरच्या मोकळय़ा जागेत आले. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सुटत नसल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाची कृती चूक असल्याचे महापौरांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत इतर सर्व अधिकाऱ्यांनीही सभागृह सोडले. या प्रकारामुळे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या वादाला नव्याने तोंड फुटण्याची शक्यता आहे. सभात्याग करण्याच्या निर्णयाचे समर्थन करीत आयुक्त बकोरिया म्हणाले, ते जे काही म्हणाले ते अशोभनीय आणि असंसदीय होते. रस्त्यांच्या प्रश्नावर या पूर्वी महापौर आणि उपमहापौरांसमवेत एक बैठक झाली आहे. त्या बैठकीत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे नियोजन केले आहे. कलम ६७ अनुसार १३०० किलोमीटरच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गणपतीनिमित्ताने विसर्जनापूर्वी या मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. या कामासाठी २ जेसीबी, ८ टिप्पर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी महापालिकेच्या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा दोष जबाबदारीचा कालावधी केवळ ३ महिने होता. तो आता डांबरी रस्त्यांसाठी ३ वष्रे आणि सिमेंट रस्त्यांसाठी ५ वष्रे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर्जाहिन काम करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. उच्च न्यायालयानेही ३० सप्टेंबपर्यंत खड्डे बुजविण्यासाठी निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. डांबर प्लांट उभा करणे ही दीर्घकालिन उपाययोजना आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ही प्रक्रिया तशी किचकट असल्याचा अनुभव आहे. रस्त्यांच्या कामासाठी १ कोटी ८९ लाख रुपयांची साहित्य सामग्री खरेदी करण्याचे ठरले आहे, असेही बकोरिया म्हणाले.