शालेय माध्यान्ह भोजनात दूध देण्याची शक्यता

राज्यात ४५ हजार टन दूध भुकटी पडून आहे. दूध अतिरिक्त झाल्याने शेतकऱ्यांना दुधाचा दर परवडत नाही. परिणामी येत्या काळात बटर, तूप यावरील वस्तू व सेवा कर १२ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत खाली आणावा, अशी शिफारस राज्य कृषी मूल्य आयोगाने केल्याचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले. राज्यात दुग्धजन्य पदार्थ करणाऱ्या व्यावसायिकांपैकी ‘सोनाई’कडे आठ हजार टन, ‘गोकुळ’कडे पाच हजार टन, ‘डायनामिक्स’कडे चार हजार टन, तर ‘पराग’ डेअरीकडे तीन हजार टन दूध भुकटी विक्रीविना पडून आहे. त्याची किंमत ६७५ कोटी रुपये एवढी आहे. जोपर्यंत दूध भुकटी वापरली जात नाही, तोपर्यंत दुधाला भाव मिळणार नाही. त्यामुळे येत्या काळात शालेय माध्यान्ह भोजनात मोफत दूध देता येईल का, याची चाचपणी केंद्र सरकारच्या वतीने केली जात आहे.

दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे राज्यातील दूध व्यावसायिकांना निमंत्रित करण्यात आले होते. समस्या निवारण करण्यासाठी काय करता येईल, याची चर्चा अर्थमंत्री व कृषिमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत निर्यातीवर प्रोत्साहनपर अनुदान देता येईल का, याबाबतही चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर काही गरीब देशांना दूध भुकटी देता येऊ शकेल काय, याचीही माहिती घेतली जात आहे. जगभरात दूध भुकटीचे दर ११० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. देशात हा दर १४५ रुपये प्रतिकिलो एवढा आहे. दूध भुकटी तयार करण्यासाठी १७० ते १८० रुपये खर्च येतो. त्यामुळे दूध भुकटीचे भाव पडलेले आहेत. दूध अतिरिक्त ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधले जात असल्याची माहिती पाशा पटेल यांनी दिली. सध्या पडून असलेली दूध भुकटी वापरली गेल्याशिवाय अतिरिक्त दुधाचा प्रश्न सुटणार नाही. परिणामी दुधाला भाव मिळणार नाही. हे लक्षात घेऊन हालचाली सुरू झाल्या आहेत, असे पाशा पटेल यांनी सांगितले.

कांद्याचा वांदा होणार?

सध्या देशात ५० लाख क्विंटल कांदा शिल्लक आहे. कर्नाटकात ऑगस्टमध्ये मोठय़ा प्रमाणात कांद्याचे पीक आले, तर कांद्याचा वांदा होण्याची शक्यता आहे. सध्या कांद्याचे दर कमालीचे घसरलेले आहेत. ते वाढण्याची शक्यता नाही, अशी बाजारपेठेत चर्चा आहे. त्यामुळे निर्यातीला प्रोत्साहन अनुदान दिले जावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले. पीक कर्जाच्या अनुषंगाने पत्रकार बैठकीत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे त्यांनी टाळले.