प्रकाश आंबेडकरांचा दावा, मौलवी, उलेमांबरोबर स्वतंत्र बैठक

औरंगाबाद : मुस्लीम मते त्या धर्मातील राजकीय नेत्यांच्या हातात नाहीत, तर ती मौलवींच्याच हातात आहेत असा दावा करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मौलवी आणि उलेमांची बैठक घेतली.

वंचित बहुजन आघाडीचा मुस्लीम ‘अजेंडा’ ठरविण्यासाठी ही बैठक आंबेडकर यांनी घेतली.

मुस्लीम मते केवळ मौलवींच्याच हातात असल्याचा आंबेडकरांचा दावा अमान्य असल्याची प्रतिक्रिया ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी सोलापूरमध्ये काँग्रेसधार्जिण्या मौलवींनी मुस्लीम मते काँग्रेसकडे वळवली. त्या वेळी ‘एमआयएम‘चे नेते असदोद्दीन ओवेसी, अकबरोद्दीन ओवेसी यांना पुरेसा वेळ देता आला नव्हता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला पुरेशी मुस्लीम मते मिळाली नाहीत. मुस्लीम मतांसाठी मौलवींशी चर्चा करण्याचा मार्ग आंबेडकर यांनी निवडला असला, तरी त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि ‘एमआयएम’मधील युतीत कोणताही बदल होणार नाही, असे जलील यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मते मिळविणाऱ्या वंचितला मुस्लीम मते मिळाली नाहीत या  निष्कर्षांवर भाष्य करताना  आंबेडकर म्हणाले, की ही मते आता मौलवींच्या हातात आहेत, असे दिसते. त्यांनी ती काँग्रेसकडे वळविली. मात्र, असे असले तरी ‘एमआयएम’शी आघाडी करण्याच्या निर्णयात काही चूक नव्हती. यापुढेही त्यांच्याबरोबर राजकीय आघाडी कायम ठेवली जाईल, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

‘एमआयएम’ने १०० जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला दिला होता. एवढय़ा जागा त्यांना दिल्या जातील का, असे विचारले असता आंबेडकर म्हणाले, की ते कितीही जागा मागतील, पण त्याबाबतची स्वतंत्र समिती आहे, ती तपासून सांगेल.  गुरुवारीच ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि या समितीतील सदस्यांची बैठकही घेण्यात आली. या बैठकीत १०० ऐवजी ८० जागांचा प्रस्ताव नव्याने देण्यात आला आहे. त्यातही तडजोड केली जाऊ शकते, असे खासदार जलील यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

काँग्रेस आघाडीबाबत तळ्यात-मळ्यात

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाची बोलणी सुरू आहे काय? त्यांचे नक्की स्वरूप काय, असे प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही वृत्तवाहिन्यांतूनच बोलायचो. नंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्या होत्या. आता मात्र अलिकडे केवळ काही पत्रांची देवाण-घेवाण केली आहे. पण चर्चा अशी काही सुरू नाही. आता काँग्रेसचे नेते काय म्हणतात, यावर आघाडी होणार की नाही, ते ठरेल, या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर अजूनही आशा आहे का, असे त्यांना विचारले असता ते उत्तर देण्यासाठी थांबले आणि बऱ्याच वेळानंतर हसत हसत काहीसे पुटपुटले. काँग्रेस आघाडीशी युती करण्याबाबतच्या प्रश्नावर ते तळ्यात-मळ्यातच दिसले.