पैठण तालुक्यातील रांजणगांव दांडगा येथे गुरूवारी सकाळी माजी सरपंच अकील पटेल आणि सरपंच रियाज शेख यांच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्यावरुन वाद झाला. हा वाद इतक्या विकोपाला गेला की या दोन गटांमध्ये लाठी, काठी आणि लोखंडी गजाने तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही बाजूंकडील ११ जण गंभीर जखमी झाले असून जखमींना पुढील उपचारांकरीता औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पाणी पुरवठा पाईप लाईन टाकण्यासाठी अभियंते आणि कर्मचारी रांजणगाव दांडगा येथे आले होते. सरपंच रियाज शेख आणि त्यांचे समर्थक काम करत असताना माजी सरपंच अकील शेख यांच्या समर्थकांनी वाद घालायला सुरुवात केली. आमच्या काळात पाईप लाईनचे काम झाले आसताना तुम्ही पुन्हा नवी लाईन कशाला टाकता यावरुन हा वाद विकोपाला गेला. यावेळी दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या त्यानंतर हा वाद लाठी, काठी व लोखंडी रॉड पर्यंत पोहोचला.

यामध्ये रियाज शेख, राजू शेख, फिरोज शहा, ईसाक शेख, अलीम शेख, अय्याज शेख, ईमरान शेख, राजू शेख, अकबर शेख, कादीर शेख आदी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पाचोडचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालय येथे हलविले आहे.

घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. हाणामारीनंतर गावकऱ्यांनी गावात शांतता राखावी असे आवाहन आमदार संदीपान भुमरे यांनी केले आहे.