औरंगाबाद : औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेची व त्याआधी नवजात बाळाचा मृत्यू झाला. नैसर्गिक प्रसूती करण्यात येईल, असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले. मात्र नंतर डॉक्टरांच्या चुकीमुळे दोघांचाही मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रविवारी संताप व्यक्त केला. सोमवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

शारदा सॅमवेल ढिलपे, असे मृत बाळंतिणीचे नाव आहे. भावसिंगपुऱ्यात राहणाऱ्या शारदाच्या नातेवाईकांनी यासंदर्भात निवासी डॉक्टरांकडे तक्रार दिल्याची माहिती आहे. सोमवारी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पेठेनगरातील शारदा ढिलपे यांना मुलगा व मुलगी असून, त्यांचे पती चालक म्हणून काम करतात. २३ जानेवारी रोजी शारदा यांना प्रसूतीसाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. प्रसूती करण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर दाखल झाले. यावेळी ढिलपे यांच्या नातेवाईकांनी नैसर्गिक प्रसूती होत नसेल तर शस्त्रक्रिया करण्यात यावी, अशी परवानगी डॉक्टरांना दिली होती. मात्र, डॉक्टरांनी नैसर्गिक प्रसूती करण्यात येईल असे म्हणून नातेवाईकांना थांबवून ठेवले. २५ जानेवारी रोजी शारदा यांची नैसर्गिक प्रसूती करत असताना सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास नवजात बालक पोटात गुदमरल्याने दगावले. तसेच शारदा यांची प्रकृतीही गंभीर झाली. याचदरम्यान प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी शारदा यांची गर्भपिशवी काढावी लागेल, अति रक्तस्त्राव होत आहे, असे ढिलपे कुटुंबीयांना सांगितले. त्यामुळे शारदा यांचा जीव वाचविण्यासाठी ढिलपे कुटुंबीयांनी डॉक्टरांना सर्वोतोपरी प्रयत्न करा, अशी विनंती केली. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शारदा यांचाही मृत्यू झाला. यावरून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

शरीरात गुंतागुंतीची प्रक्रिया

शारदा ढिलपे यांच्या पोटातील बाळ गुदमरले होते. शस्त्रक्रिया करावी लागणार होती. दरम्यान अचानक रक्तदाब कमी झाला. शारदा यांना अम्नॉटिक फ्ल्यूड अ‍ॅम्बोलिझम झाल्याचे लक्षात आले. साधारण ५० हजारांमध्ये एखाद्या महिलेला होणारा हा प्रकार आहे. बाळ गुदमरून मृत पावले. बाळाभोवतीचे पाणी मातेच्या रक्तात शिरण्याचा आणि रक्त गोठण्याच्या धोका निर्माण होतो. त्यानंतरही सर्व तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचारात कुठलीही कसूर ठेवण्यात आली नाही. मात्र दुर्दैवाने माता आणि बाळ दोघेही दगावले. शारदाची पूूर्वीची प्रसूती साधारण पद्धतीने झाली होती.

– डॉ. श्रीनिवास गडाप्पा, प्रसूती विभाग प्रमुख, घाटी