19 November 2019

News Flash

माय-मराठीसाठी सारस्वत रस्त्यावर उतरणार

आपणही मराठी शिक्षण कायदा अस्तित्वात आणण्यासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारून कृतिकार्यक्रम ठरवायला हवा.

(संग्रहित छायाचित्र)

मराठी शिक्षणासाठी कायदा करण्याची मागणी

औरंगाबाद : इंग्रजी भाषा आणि इंग्रजी भाषांच्या शाळांचे वाढत असलेले स्तोम, ही परिस्थिती तर दक्षिणेतील काही राज्यांनी त्यांच्या मातृभाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी शिक्षण कायदा केलेला आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करीत आणि मराठीच्या शिक्षणासाठी कायद्याची आवश्यकता व्यक्त करत मराठी सारस्वत आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत.  मुंबईत येत्या २४ जून रोजी मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले यांनी दिली आहे.

यासंदर्भात प्राचार्य ठाले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी भाषा आणि इंग्रजी शाळांचे स्तोम माजविले जात आहे. याला राज्य शासनाचे बळ मिळत आहे. मराठी माध्यमांच्या शाळांची स्थिती अत्यंत दयनीय होत चालली आहे. राज्य शासनाचे मराठी भाषेविषयी आणि मराठी माध्यमांच्या शाळांविषयी अक्षम्य दुर्लक्ष होत असून याचे राज्य शासनाला किंचितही गांभीर्य वाटत नाही, अशा शब्दांत प्रसिद्धी पत्रकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मराठी भाषा आणि शाळांकडे दुर्लक्ष करण्याची राज्य शासनाची कायम भूमिका राहिली तर पुढील काळात मराठी भाषा शिक्षणपटावरून नाहीशी व्हायला वेळ लागणार नाही. दक्षिणेतील काही राज्यांनी त्यांच्या मातृभाषेच्या अस्तित्वासाठी शिक्षण कायदा केला आहे. आपणही मराठी शिक्षण कायदा अस्तित्वात आणण्यासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारून कृतिकार्यक्रम ठरवायला हवा. आपला इंग्रजीला विरोध नाही. आपली मुले उत्तम इंग्रजी शिकली पाहिजेत. पण केवळ इंग्रजी नव्हे तर उत्तम मराठीसह उत्तम इंग्रजीची सध्या महाराष्ट्राला गरज आहे. आपली मराठीपणाची ओळख ठसठशीतपणे कायम ठेवून उत्तम इंग्रजीची कासही आपण धरली पाहिजे. त्यासाठी मराठी शाळांमध्ये मराठीबरोबरच उत्तम इंग्रजी शिक्षणाची मागणी केली पाहिजे. या मागणीसाठी २४ जून रोजी मुंबईत मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असे प्राचार्य ठाले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

याअनुषंगाने मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने विचारविनिमय करण्यासाठी सर्वाची एक सभा २० जून रोजी मसापच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात आयोजित केली आहे. या सभेला औरंगाबाद शहर व मराठवाडय़ातील मराठी लेखक, विचारवंत, पत्रकार, लोकप्रतिनिधी, वाचक, प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, प्रकाशक, विद्यार्थी आणि मराठी भाषेबद्दल आस्था असणाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले आणि कार्यवाह दादा गोरे यांनी केले आहे.

First Published on June 19, 2019 2:14 am

Web Title: president of marathwada sahitya parishad demand law for marathi education
Just Now!
X