20 February 2019

News Flash

प्रतिष्ठित घरची मुले नशेच्या गोळ्यांच्या आहारी

शेख बबलू व त्याचे साथीदार अनेक प्रतिष्ठित घरच्या मुलांना नशेच्या गोळ्या पुरवतात.

औरंगाबाद शहरातील अनेक प्रतिष्ठित घरची मुले नशेच्या आहारी गेली असून दीर्घकाळ नशा, गुंगीत ठेवणारी आणि महागडय़ा दराने विकली जाणारी अशी औषधे कर्नाटकातून आणली जात असल्याचे सोमवारी समोर आले आहे. सोमवारी पकडलेला औषध साठा हा

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या हुबळी-औरंगाबाद या बसमधून येथे येत असल्याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन व पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत गोळ्यांची पेटी जप्त केली. याप्रकरणी औषध निरीक्षक राजगोपाल मूलचंद बजाज यांनी जवाहरनगर ठाण्यात नोंदवलेल्या फिर्यादीनंतर बायजीपुरा भागात राहणारा शेख बबलू शेख बन्ना (वय ३५) याला पोलिसांनी अटक केली आहे.

औषध निरीक्षक राजगोपाल यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळालेल्या माहितीनुसार हुबळी-औरंगाबाद या कर्नाटक महामंडळाच्या बसने एक जण विनापरवाना नायट्राझेपम गोळ्या (आयपी) व नायट्रोसन-१० या नशेच्या गोळ्यांच्या औषधांचा बॉक्स येत आहे. सकाळी जालना रोडवरील एसएफएस शाळेसमोर हा बॉक्स उतरवून घेण्याच्या उद्देशाने एकजण दुचाकीवर थांबला आहे. त्यानुसार दोन पंच शेख माजीद शेख व अनिल कौतिकराव ढगे यांना सोबत घेऊन उपरोक्त शाळेजवळ पोहोचलो. सहायक पोलीस निरीक्षक सोनवणेही तेथे सहकाऱ्यांसह सापळा रचून उभे होते. कर्नाटकची एसटी शाळेजवळ थांबली असता आतून वाहक जगदीशन विलास डिग्गी यांनी खिडकीतून दुचाकीस्वाराकडे नशेच्या औषधांची पेटी सोपवली. शेख बबलू शेख बन्ना (रा. संजयनगर, बायजीपुरा) याच्याकडून ती जप्त करण्यात आली. याप्रकरणी वाहक जगदीशन याचीही चौकशी केल्याची माहिती औषध निरीक्षक राजगोपाल बजाज यांनी दिली. दरम्यान, शेख बबलू हा साथीदारासह अशा प्रकारची औषधे पुरवत असल्याची माहिती समोर येत असून त्याचे सहकारी कोण व तो कोणाला अशा औषधांचा पुरवठा करतो, याची माहिती पोलीस घेत आहेत.

एक गोळी तीनशे ते सातशेला

शेख बबलू व त्याचे साथीदार अनेक प्रतिष्ठित घरच्या मुलांना नशेच्या गोळ्या पुरवतात. एक गोळी ३०० ते ७०० रुपयांना ते विकायचे. सोमवारी १७०० गोळ्यांची पेटी पकडण्यात आली. यातून एक गोळी तीनशे ते सातशे रुपयांना विकली तर आरोपींना पाच ते सहा लाखांची कमाई होत असे. शहरातील अनेक पालकांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन मुले नशेच्या आहारी गेल्याची कैफियत मांडली होती.

First Published on November 6, 2018 4:39 am

Web Title: prestigious home kids taking drug tablets