सिल्लोड तालुक्यातील भवानीनगरमधील सात वर्षांची ऋतुजा रोज शाळेत जात असे. ती शाळा आता ओसाड पडली आहे. ऋतुजा आता नवीन शाळेत येते, तीन-साडेतीन किमीची पायपीट करून. कारण राज्य सरकारने पटसंख्या कमी झाल्याचे कारण देत १३०० प्राथमिक शाळा बंद केल्या. ऋतुजाची शाळा त्यातलीच एक. पटसंख्या कमी झाली या कारणामुळे आता सात वर्षांच्या चिमुकलीला तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते.

काटेरी झुडपांमधून नागमोडी वळणाची वाट तुडवत जाण्यासाठी ऋतुजाला आता सकाळी आठ-सव्वा आठला घर सोडावे लागते. पूर्वी तिची शाळा अगदी घराजवळ होती. आता ती किती दिवस पायपीट करेल? अशीच स्थिती जीवन व शुभम सुलताने या दोन्ही भावांची.  सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंधारी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेअंतर्गत येत असलेल्या भवानीनगर, शेखलालवाडी, गुंजाळवाडी यांच्यासह २० शाळा बंद झाल्या आहेत. जिल्ह्य़ात अशा ४० शाळा. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना दूरच्या शाळेत जावे लागते. शेखलालवाडी येथील बंद केलेल्या शाळेतील पूनम, प्रतीक्षा म्हस्के व विद्या सुलताने या तिघींसह अनेकांसाठी शाळा आता दूर गेली. ‘अधे-मध्ये कसा काय निर्णय घेतला कोण जाणे?’ जरा संतापूनच विद्यार्थ्यांचे पालक बोलत होते. त्यावर शिक्षकांनी त्यांना  सरकारी पत्र दाखवले. ते पाहताच ऋतुजाचे वडील देवचंद सुलताने थंडच पडले. देवचंद सुलताने हे शेतकरी. जेमतेम तीन-चार एकर शेती. सिल्लोड तालुक्यातील आळंदपासून २०-२५ किमी अंतरावरील एका डोंगराच्या पायथ्याशी राहतात. हा सर्व भाग अत्यंत कमी पाण्याचा. शेती कोरडवाहू. घरच्या शेतीत राबायचे आणि त्यातही भागले नाही तर रोजंदारीने दुसऱ्याकडे काम करायचे. आता त्यांना दुसरीत शिकणाऱ्या ऋतुजाच्या शिक्षणाची काळजी वाटणे साहजिकच. पण पर्याय काय?

आता या शाळांना कुलूप लागले आहे. नवीन शाळा अनेक मुलांना लांब झाली. शाळा जवळ असावी, यासाठी सरकार असते, की लांब व्हावी यासाठी, असा नवाच प्रश्न या निर्णयामुळे निर्माण झाला आहे. भवानीनगर, शेखलालवाडी ही प्रातिनिधिक उदाहरणे. राज्यातील १३०० शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रक्रिया जरा दुरावलीच, एवढे नक्की.

कुलूप बंद शाळा भकास : आघाडी सरकारने २००३ साली एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून वस्ती शाळा काढल्या. सुरू झाल्या तेव्हा त्या एखाद्या कुडात, झोपडीत सुरू असायच्या. पुढे या शाळांना २००८-०९ साली जिल्हा परिषदेच्या शाळांचा एक भाग म्हणून सामावून घेतले. नवीन दोन खोल्यांची इमारत, घसरगुंडीसह इतरही खेळण्याचे साहित्य पुरवले गेले. आता या शाळांना कुलूप लागले आहे. आजूबाजूला गवत उगवलेले आहे. परिसर भकास झाला आहे.