रस्त्यावर उतरायलाही उशीरच; पृथ्वीराज चव्हाण यांची कबुली

मोदी सरकारने घेतलेल्या आर्थिक निर्णयावर कठोर टीका करत, नोटबंदी ही अमेरिकेतील क्रेडीटकार्ड कंपन्यांना हितकारक व्हावी, यासाठी घेतलेला निर्णय आहे, असा आरोप करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकार विरोधातील असंतोष संघटित करण्यास काँग्रेस कमी पडत असल्याची कबुली गुरुवारी दिली. नांदेड महापालिकेच्या प्रचारानिमित्त मराठवाडय़ात आलेल्या चव्हाण यांनी आज केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सर्वसामान्य जनता त्रस्त असल्याचे सांगत आर्थिक आघाडय़ांवर मोदी सरकार पूर्णत: अपयशी ठरत असल्याचे सांगितले. मात्र, सरकार विरोधी भूमिका घेण्यासाठी रस्त्यावर उतरण्यासही पक्षास काहीसा उशीर झाल्याचे ते म्हणाले. त्यांचा हा टोला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना असल्याचे मानले जात आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधीच सकारात्मक नव्हते. मात्र, उत्तरप्रदेश निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन आणि मध्यप्रदेशामध्ये झालेला गोळीबार यामुळे राज्यातील शेतकरी संप चिघळू नये म्हणून कर्जमाफीचा निर्णय घेतला. पण त्याची अंमलबजावणी करताना सांगितलेल्या आकडेवारीमध्ये कमालीची अनागोंदी असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना चोर असल्यासारखी वागणूक दिली जात आहे. प्रकाश मेहता व सुभाष देसाई यांची चौकशी लोकायुक्तांकडून होत आहे. खरे तर या प्रकरणात निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी व्हावी. प्रकाश मेहतांनी दिलेल्या मंजुरी प्रकरणात मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्याची वेळ आली तर लोकायुक्त ती करू शकणार नाहीत. त्यामुळे या सरकारच्या प्रामाणिकपणाच्या हेतूवर शंका असल्याचे सांगत त्यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. आमच्या नाही तर नाही किमान यशवंत सिंन्हांच्या प्रश्नांची तरी उत्तरे द्या, असे ते म्हणाले. केंद्र सरकारकडून कृषी उत्पन्न दुप्पट करु आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करुन त्याची अंमलबजावणी करू, अशी दिलेली आश्वासने पुन्हा ‘जुमला’ असल्याचे ते म्हणाले. वेगवेगळया पातळयांवर दोन्ही सरकार कसे अपयशी होत आहे, हे सांगणारे पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्ष म्हणून हा असंतोष संघटित करण्यास कमी पडत असल्याचे मान्य केले. अगदी रस्त्यावर उतरायलाही उशीर झाल्याचे सांगत ते म्हणाले,‘ पक्षातील नेत्यांनी माझी सूचना ऐकली तर त्यांना एवढेच सांगेन की, गावोगावी जा आणि सरकारच्या कामांविषयी त्यांच्याशी चर्चा करा.’ आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे पाहत, हे आमचे औरंगाबादचे नेते आहेत. त्यांनी स्थानिक पातळीवर काम सुरू केले तरी बरेच होईल, असा चिमटाही त्यांनी काढला.

अशोक चव्हाणांच्या मदतीला पृथ्वीराज चव्हाण!

विशेष प्रतिनिधी, मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उद्या सभा होणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत अशोकरावांना उमेदवार देण्यास पृथ्वीराजबाबांनी विरोध केला होता. या पाश्र्वभूमीवर दोन चव्हाण एकत्र येण्याला विशेष महत्त्व आहे. नांदेज-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या शहरात उद्या संयुक्त चार जाहीर सभा होणार आहेत. या दोन्ही चव्हाणांमध्ये पूर्वी फार काही सख्य नव्हते. ‘आदर्श’ घोटाळ्यात नाव असल्याने अशोक चव्हाण यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी दिल्लीत मांडली होती. पण पक्षाने अशोकरावांना संधी दिली. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला असताना फक्त नांदेड आणि हिंगोली या दोन आजूबाजूच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला यश मिळाले होते. दोन्ही चव्हाणांनी सध्या तरी मतभेदांना पूर्णविराम दिला आहे.