कर्जमाफीसाठीची विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा मराठवाडय़ात 

कर्जमुक्तीसाठी पंचांग पाहून मुहूर्त काढणार आहात का, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. कर्जमाफी देता येणार नाही, अशी वारंवार भूमिका मांडणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे कोंडी झाली, असेही चव्हाण म्हणाले. औरंगाबाद येथे शेतकरी संघर्ष यात्रेनिमित्त आयोजित आमखास मैदानावरील जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, पतंगराव कदम, दिलीप वळसे पाटील यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते.

आमची मागणी पीककर्ज माफ करावे, अशी आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही मागणी आम्ही लावून धरत आहोत, पण सातत्याने ती मान्य करता येणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस सांगत होते. तिकडे उत्तर प्रदेशात कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर कर्जमाफी देऊ, असे फडणवीसांनी तत्त्वत: मान्य केले. मात्र, योग्य वेळी कर्जमाफी देऊ, असे ते आता सांगत आहेत. कर्जमाफीसाठी पंचांग बघून मुहूर्त काढणार आहात का, असा सवाल चव्हाण यांनी केला.  तत्पूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी न देता अशी मागणी करणाऱ्या १९ आमदारांना सरकारने निलंबित केले. मग ९ आमदारांचे निलंबन का मागे घेतले? सरकार दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ज्यांचे निलंबन मागे घेतले आहे, तेदेखील कामकाजात सहभागी होणार नाहीत, असे ते म्हणाले. तूर खरेदी केंद्रात बारदाना नाही, हे सरकारचे अपयश वाटत नाही का?, खरेतर लाज वाटायला हवी. एखाद्या वर्षांत एखादे पीक बंपर येत असते, पण त्याकडे लक्ष देऊन वेळोवेळी नियोजन करण्याची गरज आहे, असेही पवार म्हणाले.

‘ माझ्या कार्यकाळामध्ये किती सिंचन झाले आहे, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे बराच गदारोळ झाला. त्यात कोणी काय केले, हा प्रश्न नाही. मात्र, भाजप सरकारने गेल्या तीन वर्षांत सिंचनाच्या क्षेत्रात काहीही काम केले नाही. सिंचनाच्या क्षेत्रात त्यांनी काय बहाद्दरी घडवली, हे त्यांनी प्रकाशित केले नाही. ते त्यांनी करायला हवे. या वर्षी तर अर्थसंकल्पात सिंचनासाठीची तरतूद गेल्या वर्षीपेक्षाही कमी आहे. आम्हाला सभागृहात या विषयावर बोलताच आले नाही. मात्र, सिंचनाच्या क्षेत्रात भाजप सरकारला काम करता आले नाही.’ -माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

शेतकरी संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा हाती घेतला जाणार असून ही यात्रा संपल्यानंतर आठ दिवसानंतर उत्तर महाराष्ट्र, धुळे, बुलढाणा, नंदूरबार, पालघर अशी यात्रा काढली जाणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. लवकरच हा कार्यक्रम जाहीर होईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.